Thursday 13 June 2019

दगड आजारी पडला...

त्यांनी बोंब ठोकली,
दगड आजारी पडलाय !!
म्हणाले,
जो दगडाला शिवू शकेल
असाच डाॅक्टर पाहिजे...
तितक्यात ओपन कॅटगरीतला
एक डाॅक्टर पुढे आला,
त्याने दगडाला स्टेथोस्कोप लावून
ठोके ऐकले,
दगडाची थुंकी तपासली,
शी तपासली,
रक्त घेतलं, आणि ताप मोजत
दगडाच्या आजाराचं
निदान करून
औषधही दिलं...

दगडासोबत आता
दगडाचे भक्तही घेतात औषध
प्रसाद मानून,
पण डाॅक्टर म्हणाला,
प्रसाद नको, दक्षिणाच द्या.

डाॅक्टरला दगडाचरणी
मेरीट गहाण ठेवताना पाहिल
तेव्हा आरक्षण कोट्यातला डाॅक्टर
मंदिराच्या बाहेर
सुरक्षित अंतरावर
सदसदविवेकावर गर्व करीत
गालातल्या गालात हसत होता...
म्हणत होता,
बरं झालं
मी माणसांचाच डाॅक्टर झालो!!!

*राज असरोंडकर*

Monday 20 May 2019

झूंडींचा कोडगेपणा

मोदींची राजकीय चाटुगिरी करणाऱ्या प्रत्येकाच्या पोस्टवर मी लिहितो..गेल्या चार वर्षात मोदी सरकारने मोदींच्या इमेजला साजेसं उभारलेलं किंवा नूतनीकरण केलेलं एक सरकारी हाॅस्पिटल, एक सरकारी शाळा, एक एसटी डेपो दाखवा!! पण भारत-पाकिस्तान, काश्मिर वाद, लव्हजिहाद, हिंदुत्व, सावरकर, जीना, राममंदिर, हिंदू खतरे में सारख्या अत्यंत टुकार बकवास विषयांत लोकांना भाडोत्री ट्रोलद्वारा गुंगवून ठेवून दैनंदिन जीवनातले रोजचे प्रश्न सोडवण्यात आलेल्या सपशेल अपयशावर हिंदुत्वाचं पांघरूण घालण्यात सतत व्यस्त असलेल्या तरीही अधुमधून विकासाचे अत्यंत खोटारडे दावे करणाऱ्या भाजपा-आरएसएस सरकारचं आणि सरकारी चमच्यांचं थोबाड फोडणारं हे विदारक चित्र आहे, औरंगाबाद येथील घाटी सरकारी रूग्णालयातील. आॅपरेशन झालेल्या बापाचं सलाईन घेऊन टाचा उंचावून ही चिमुरडी अर्धा तास उभी होती. आॅपरेशन थिएटरपासून वार्डापर्यंत ती याच अवस्थेत आली. मातृछत्र हरवलेले भाऊबहीण बापाची काळजी घेताहेत. भावाने धावपळ करून सलाईन स्टॅन्ड मिळवलं, तेव्हा या मुलीची सुटका झाली. उत्तरप्रदेशात आॅक्सिजनविना शेकडो बालकं तडफडून मरतात, पण तिथल्या सीएमला एन्काउंटरमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. कधी कुठल्या विडियोत अपंग नवऱ्याला पाठीवर घेऊन दाखल्यासाठी चकरा मारणारी महिला दिसते, तर कधी अॅम्बुलन्स मिळाली नाही म्हणून कोणी बायकोचं तर कोणी मुलीचं प्रेत कित्येक किलोमीटर खांद्यावर वाहून नेताना दिसतो. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनांबद्दल आवाज उठू लागला की भारतमाता की जय चा गोंगाट सुरू करून तो आवाज दाबला जातो. सरकार कुठला खुलासा करत नाहीच, पण मेंदूभ्रष्ट झालेल्या बेभान भेसूर झुंडी अंगावर येताना दिसतात. लाजशरम नसलेली कोडगी व्यवस्था भोवताली वावरते आहे.

कायदा कशासाठी ?

कायदा नेमका कशासाठी असतो....गुन्हे रोखण्यासाठी कि गुन्हे घडल्यावर गुन्हेगारांना फक्त शिक्षा व्हावी म्हणून.....? मध्यंतरी भरून हत्येच्या घटनांनी संपूर्ण देश ढवळून निघाला होता. तेंव्हा आपण सारे म्हणालो होतो, अश्या गुन्ह्यांसाठी कडक कायदा हवा....भ्रष्टाचाराविरोधात तर एक नवी स्वातंत्र्य लढाईच सुरु झाली होती....तेंव्हाही आपण म्हणालो होतो, भ्रष्टाचाराविरोधात कडक कायदा हवा...महाराष्ट्रात मधल्या काळात दरोडे सत्र सुरु होतं , दरोडेखोर सरळ नागरिकांवर जीवघेणे हल्ले करत होते...देवांनाही त्यांनी सोडले नाही...तेंव्हा आपण त्यांना धडा शिकवणार होतो...वृद्धांची हत्या झाली कि देशभर वृद्धांच्या सुरक्षेवर चर्चा होते...शाळांच्या बसेसना मोठा अपघात झाला कि सगळ्या वाहिन्यांवर तोच विषय....आता देशभर बलात्काराच्या घटनांवर चर्चा सुरु आहे. आपण पुन्हा म्हणालो, बलात्काराच्या गुन्ह्यासाठी कडक कायदा हवा...प्रत्येकवेळी आपण नव्या कायद्यांची मागणी करतो...आणि त्या त्या वेळी असं वातावरण पेटलेलं असतं कि फाशीशिवाय आपल्याला काही सुचतच नाही....गुन्हा घडल्यावर फिर्यादीला मजबुतीने उभं राहावं लागतं , आपली बाजू मजबुतीने मांडावी लागते, पुराव्यांसाठी पोलिसांना संयम राखून सहकार्य करावं लागतं , नागरिकांनी साक्षीदार म्हणून पुढे येणं तर अधिक महत्वाचं आहे, ( जे अभावाने घडतं ) न्यायालयासमोर गुन्हा सिद्ध झाला तरच शिक्षा सुनावली जाते, याचे भानच कोणी ठेवत नाही....फक्त स्वतापुरता स्वताभोवती कोष करून जगणार्यांच्या समाजात कायद्यातील कठोर तरतुदी सुद्धा कुचकामी ठरतात. वास्तविक जागरूक समाजात गुन्ह्याचं प्रमाण कमी होऊ शकतो. असा प्रयत्न आपण का नाही करत...कायदा हि केवळ एक सहाय्यभूत व्यवस्था असायला हवी. पण घडतं उलटंच ....आपण सारे काही कायदा स्थापित यंत्रणेवर सोपवून नामानिराळे राहतो....मग प्रश्न पडतो, खरंच कायदा नेमका कशासाठी असतो....गुन्हे रोखण्यासाठी कि गुन्हे घडल्यावर गुन्हेगारांना फक्त शिक्षा व्हावी म्हणून.....?

Friday 9 March 2018

बोटक्लब

*भाजपाच्या सत्तेत भारतमातेची विटंबना*

उल्हासनगर महानगरपालिकेच्या बोटक्लब उद्यानातलं भारतमातेचं शिल्प सद्या मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे दुरवस्थेत आहे. केवळ व्यापारी हेतूने राजकारण करणाऱ्या उल्हासनगरातील भाजपाकडून राष्ट्रभक्तीची अपेक्षाच करणं अवास्तव ठरतं. जिथे देशभरातच वंदे मातरम, भारतमातासारखे मुद्दे स्वार्थी राजकारणात तोंडी लावण्यापुरती वापरणारी भाजपा उल्हासनगरात सत्तेत आहे. बोटक्लबमधील भारतमातेच्या विटंबनेमुळे भाजपाचा ढोंगी चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

*प्रल्हाद अडवानींनी उभारलं होतं*
*बोट क्लब उद्यान*

जनसंघाचे प्रल्हाद अडवानी उल्हासनगरच्या नगराध्यक्षपदी होते, त्यावेळी नगरपालिकेचं बजेट अवघं ४ कोटींचं होतं. तरीही इच्छाशक्तीच्या जोरावर अडवानींनी बोटक्लब उद्यान उभं केलं. आज ७०० हून अधिक कोटींचं बजेट असताना त्या उद्यानाला अक्षरशः अवकळा आली आहे. या उद्यानात शाळकरी मुलांच्या वनसहली यायच्या,
सहभोजन व्हायचं. हिरवाईने नटलेलं होतं हे उद्यान. उद्यानातील तलावात बोटींगची व्यवस्था होती. नागरिकांसाठी बोटक्लब उद्यान एक आवडतं विरंगुळा ठिकाण होतं.

*माहितीपूर्ण राष्ट्रशिल्पंही उभारली होती*

प्रभु रामचंद्र, गुरू गोविंदसिंग, छत्रपती शिवराय, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई, महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एका प्रसंगावर आधारित वास्तुशिल्प आणि त्या प्रसंगाची सविस्तर माहिती असं त्या राष्ट्रशिल्पांचं स्वरूप होतं. त्यातली बहुतेक शिल्प गायब असून, प्रभु राम, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई यांची शिल्प दुरवस्थेत राजकारणांच्या कोडगेपणाची साक्ष देत उभी आहेत. यात एक शिल्प भारतमातेचं आहे, ज्यावर सारे जहांसे अच्छा हे गीत कोरलेलं आहे. भारतमातेचं हे शिल्पही तिथे बकाल अवस्थेत उभं आहे. अस्वच्छतेचे दूत म्हणून ओळखली जाणारी डुकरं या शिल्पांची देखभाल करताहेत.

*यापूर्वी वेधले होते दुरवस्थेकडे लक्ष*

कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून, नगरसेवक असताना आणि नंतर चळवळीच्या स्थापनेनंतरही हा विषय वारंवार चव्हाट्यावर मांडला आहे. प्रत्येकवेळी कायमस्वरूपी उपाययोजनांची हमी देऊन तात्पुरती साफसफाई केली जाते. सद्यस्थितीत कचरा वाहतूक ठेकेदाराला वाहनतळासाठी बोटक्लब उद्यानाची जागा देण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजनेतील जलकुंभाची उभारणीही उद्यानात करण्यात आली आहे. त्यामुळे उद्यानाला अवकळा आली आहे. उल्हासनगर मनपा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या मेंदूत किती कचरा भरलाय, याची प्रचिती या उद्यानाची दुरवस्था पाहून येते.

*मन की मैल ना धोयी...*

उल्हासनगरात सद्या स्वच्छता अभियानाने जोर धरला आहे. ज्यांनी कधी स्वतःच्या धार्मिक दरबारासमोरील अस्वच्छतेबाबत किंवा एकूणच शहरातील समस्यांबाबत एक अवाक्षर काढलेले नाही, अशा व्यक्तींना महापालिकेने स्वच्छता दूत नेमले आहे. शहारात जाहिरातींमध्ये जोरदार स्वच्छता मोहिम सुरू आहे. पण बोटक्लब उद्यानासारखी सार्वजनिक ठिकाणं या मोहिमेपासून दुर्लक्षित आहेत.

*सगळा हलकटपणा खाजगीकरणासाठी*

उल्हासनगर महापालिका बोटक्लब उद्यानाची निगा राखू शकली नसती, असं नाही, पण ही जागा खाजगीकरणाच्या नावाखाली गिळंकृत करण्यासाठी बडी धेंडं टपलेली आहेत. लोकप्रतिनिधीही स्वार्थासाठी भूमाफियांसोबत आहेत. एकदा हा डाव कायद्याने वागा लोकचळवळीने उधळून लावला होता. मात्र, लोकप्रतिनिधींची लालसा संपलेली नाही. उद्यानाच्या खाजगीकरणाचा विषय कधीही डोकं वर काढू शकतो. अशा वेळी ही सर्व राष्ट्रशिल्पं उखडून फेकून द्यायला महापालिका मागेपुढे बघणार नाही. महापालिकेत सत्ता भाजपाची आहे आणि सद्यस्थितीत भाजपाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

*बोटक्लब युजर्स फोरमची घोषणा*

कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी बोटक्लब युजर्स फोरमची घोषणा केली असून, हा नागरिकांचा फोरम उद्यानाच्या पुनर्जीवनासाठी कार्यरत राहिल. सद्या ती जागा ज्यांच्या ताब्यात आहे, त्यांच्याकडून ती ताबडतोब काढून घ्यावी, ही फोरमची पहिली मागणी असेल. उल्हासनगरातील कोणीही जागरूक नागरिक या फोरममध्ये सहभागी होऊ शकतात, असे आवाहन राज असरोंडकर यांनी केलं आहे.

संपर्क : 9850044201
kaydyanewaga@gmail.com

शासनाच्या गटारी उपाययोजना

"बंदिस्त जागेत सफाई करताना कामगारास अस्वस्थ वाटल्यास तो अर्ध्यातून बाहेर येऊ शकेल!!!"

ही मेहेरबानी दाखवलीय, महाराष्ट्र शासनाने, भुयारी गटारात उतरून काम करणाऱ्या कामगारांसाठी!!!

सरकार असं नाही म्हणत की भुयारी गटारात कामगारांना उतरवून गु-घाणीत शिरून सफाई करण्याची अमानवीय पध्दतच आम्ही बंद करू. उलट, भुयारी गटारं कामगारांकडून साफ करून घेताना कोणकोणती काळजी घ्यावी, याबाबतचं एक निर्लज्ज परिपत्रक राज्यातलं उलट्या काळजाचं सरकार जारी करतं. तेही स्वयंस्फूर्तीने शासनाचं कर्तव्य म्हणून नाही, तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने फटकारल्यानंतर.

मीरा-भायंदर महानगरपालिका क्षेत्रातील अनुराधा इंडस्ट्रीअल इस्टेटमध्ये भुयारी गटारांची सफाई करताना, तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मार्गदर्शक तत्त्व आखून दिलीत. त्यांनाच अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने आज ५ मार्च, २०१८ रोजी एक परिपत्रक जारी करण्याची औपचारिकता पार पाडली आहे.

या परिपत्रकात दिलेल्या सूचना वर वर आदर्शवत वाटतात, पण स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आणि संबंधित ठेकेदाराकडून सुरक्षिततेच्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या गेल्यात, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी घडून येण्याची काही शक्यता नाही. ज्या स्थानिक संस्था स्वतःच्या झाडू कामगारांच्या सुरक्षिततेच्या कुठल्याही उपाययोजना करीत नाहीत, त्या संस्था असंघटित कंत्राटी कामगारांच्या जीवाची पर्वा करतील, याची सूतराम शक्यता नाही.

परिपत्रकाची सुरूवात शक्यतो यांत्रिकी पध्दतीने करावी, अशी करून त्या सूचनेची एकाच ओळीत बोळवण करून, उर्वरित अख्खं परिपत्रक कामगारांकडून सफाई करून घेताना कोणती काळजी घ्यावी, यावर आहे. नागरिकाच्या वैयक्तिक प्रतिष्ठेच्या संविधानिक अधिकारांचं हनन तर सोडाच, पण एखाद्याला मृत्यूच्या दाढेत ढकलून मरू नये म्हणून घ्यावयाची काळजी नमूद करणारं परिपत्रक काढून सरकारने संवेदनहीनताच दाखवली आहे. मानवी मैला डोक्यावरून वाहून नेण्याची प्रथा बंद आहे, म्हणून सांगितलं जातं आणि त्याच मैल्यात उतरण्यापूर्वी घ्यायच्या खबरदारीबाबत सूचना जारी करून सरकारने एकप्रकारे ह्या अमानवीय प्रथेलाच अप्रत्यक्ष राजमान्यता दिली आहे. या सूचनांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या तथाकथित मार्गदर्शक तत्त्वांचा आधार असेल तर आयोगातील मंडळींनीच आधी मानवतेची संकल्पना नीट समजून घेण्याची गरज आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते.

*ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटीक्स

*ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटीक्स*

उत्कृष्ट संसदपटू होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांची या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नेतृत्वात निर्मिती होण्याच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटीक्स सुरु केले होते. बाबासाहेब स्वतः या संस्थेचे संचालक होते व शां. श. रेगे रजिस्ट्रार होते. देशातील लोकशाहीविषयक विचाराला आणि कार्याला परिणामकारक चालना मिळावी, त्याचप्रमाणे आपल्या नियोजित रिपब्लिकन पक्षामध्ये तरुणांची भारती व्हावी, ह्या हेतूने राजकारणात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी हे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले होते. जे विधिमंडळात कामकाज करण्याची महत्वाकांक्षा बाळगतात त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था या प्रशिक्षण केंद्रात बाबासाहेबांना करायची होती. शिक्षक होऊ इच्छिणारा मनुष्य आपल्या विषयात प्रवीण पाहिजे. त्याला उत्तम रीतीने व्याख्यान देता आलं पाहिजे, त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक पाहिजे, विद्यालयाचा लौकिक शिक्षकाच्या कर्तुत्वावर आणि वक्तृत्वाच्या सामर्थ्यावर बराच अवलंबून असतो, असे बाबासाहेबांचे मत होते. १ जुलै ५६ ते मार्च ५७ पर्यंतच हे विद्यालय चालले. बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर पोरके होऊन ते बंद पडले. संसदीय संस्थेमध्ये सभागृहाला आपल्या सौम्य अथवा तीक्ष्म तर्कशुद्ध आणि माहितीपूर्ण भाषणाने जो सभासद भरून टाकू शकतो, तोच सभासद यशस्वी होऊ शकतो, हे बाबासाहेबांचे उद्गार....ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटीक्स मध्ये राजकारण, अर्थशास्त्र, अंदाजपत्रक, कामगार संघटना, संसदीय कामकाजविषयक नियम आणि परंपरा इत्यादी आवश्यक विषयांबरोबर बाबासाहेबांनी वक्तृत्व साधनेला महत्व दिले होते. डिसेंबर ५६ मध्ये बाबासाहेब स्वतः या संस्थेत वक्तृत्वावर व्याख्यान देणार होते. पण त्यांच्या आकस्मिक परीनिर्वाणाने एका प्रभावी वक्त्याच्या मार्गदर्शनाला ती संस्था व तिथले उत्सुक विद्यार्थी मुकले...

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे या पुस्तकातून.*

प्रचार व प्रसार  : राज असरोंडकर
कायद्याने वागा लोकचळवळ

" ट्रेनिंग स्कूल फाॅर एन्ट्रन्स टु पाॅलिटिक्स " सारखे विषय कायद्याने वागा लोकचळवळीच्या अजेंड्यावर आहेत !!!

वसंत भोईर : लोकवैज्ञानिक

प्रदूषणविरोधी उपकरण बनवणाऱ्या वसंत भोईरांना
कायद्याने वागा चा लोकवैज्ञानिक पुरस्कार

कारखाने आणि वाहनांतून बाहेर पडणारे वायुपदुषण रोखण्यासाठी डोबिवलीतील सोनारपाडा येथील वसंत भोईर यांनी एक यंत्र तयार केले आहे. या यंत्राच्या माध्यमातून हवेतील कार्बन डायॉक्साईड शोषून घेवून तयार झालेली शुध्द हवा पुन्हा वातावरणात सोडणे शक्य होणार आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून वसंत भोईर वेगवेगळ्या संकल्पना राबवून पर्यावरणावर काम करु इच्छित आहेत. पण शासनदरबारी त्यांच्या संशोधनाची, प्रयत्नांची, धडपडीची दखल घेत नसल्याची खंत भोईर यांना होती. कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी आपला ११ मार्च रोजीचा वाढदिवस वसंत भोईर यांच्या धडपडीला अर्पण करून त्यांना लोकवैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित केले व उपस्थितांना सामाजमाध्यमातून त्यांचे संशोधन सरकारपर्यंत पोचविण्याचे आवाहन केले. 

वसंत भोईर मेकमको कंपनीत कामाला आहेत. काम करताना अनेक कल्पना त्यांच्या डोक्यात येत असतात आणि मग त्या सत्यात उतरविण्यासाठी सुरू होते, वसंत भोईरांची धडपड. नवनवीन शोधात त्यांच्या डोक्यात विचारांची चक्रे अखंड सुरू असतात. घराच्या छपरावर प्रदुषणामुळे जमा होणाऱ्या कार्बनच्या थराने वसंत भोईरांना अस्वस्थ केले आणि त्यातूनच जन्माला आले, वसंतयंत्र...जणू प्रदुषणमुक्त वातावरणात आपल्या जीवनात वसंत फुलवू पाहणारा एक विज्ञानमंत्रच....

वसंत भोईर यांनी केवळ हवेतील कार्बन शोषून घेणारा आराखडा तयार केलेला नसून, रेल्वे गाड्यांतील मलविसर्जनापासून गॅस व वीज निर्मितीचीही संकल्पना त्यांच्याकडे तयार आहे. वसंत भोईर यांनी आपल्या प्रत्यक्ष अनुभवातून तयार केलेल्या पर्यावरणविषयक उपाययोजनांकडे समाजाचं लक्ष द्यावं व त्यांच्या धडपडीला सामाजिक पाठबळ मिळावं, यासाठी राज असरोंडकर यांनी त्यांचा यंदाचा 11 मार्च रोजीचा वाढदिवस वसंत भोईर यांच्या प्रयत्नांना अर्पण केला. कमलादेवी महाविद्यालयाचे संचालक सदानंद तिवारी, विविधा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विलास देशपांडे, कायद्याने वागा चे केंद्रीय कार्याध्यक्ष विनायक जाधव, कायद्याने वागा हौसिंग कन्झुमर फोरमचे अध्यक्ष व उद्योजक भोजराज वाधवा, राजेश छाब्रिया, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे उत्तम जोगदंड व श्रीप्रसाद खुळे, टिएचआर बचत गट महासंघाच्या महाराष्ट्र अध्यक्षा जयश्री देशमुख, स्थानिक नगरसेविका प्रमिला पाटील, सोनारपाडाचे माजी सरपंच मुकेश पाटील, कायद्याने वागाचे कडोंमपा समन्वयक बापू राऊत, पत्रकार किशोर पगारे, प्रफुल केदारे, साहित्यिका वृषाली विनायक, कल्याण शहर समन्वयक राकेश पद्माकर मीना, सागर संजीवनी, स्वप्नील पाटील, एड. भुजंग मोरे, एड. निलेश मोहिते, विजय गौंड, शीतल बावधनकर, संगीता मोहोड, ललिता पेठकर, आन्सर कॉम्पुटर चे नितीन शेठ, उद्योजिका शिल्पा वाडकर, अपना बँकेचे शाखा अधिकारी मंगेश असरोंडकर, उल्हासनगर मनसे अध्यक्ष प्रदीप गोडसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वसंत भोईर यांच्या प्रयोगाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

ट्रकमधून बाहेर पडणारा काळा धूर उपकरणातून बाहेर पडल्यावर त्याला वास येत नाही, तापमान कमी होते, व आवाजही कमी होतो, हे यावेळी भोईर यांनी दाखवून दिले. विशेष म्हणजे, कामा चे अध्यक्ष देवेंद्र सोनी, मेट्रो कंपनीचे उदय वालावलकर, झेन केमिकलचे सी. एन. कदम, आणि जनक रावल अशा उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनीही प्रात्यक्षिक पाहून वसंत भोईर यांचे कौतुक केले.

हवेत कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढलेले आहे. हाच कार्बन डायऑक्साईड अवकाशात वर जातो आणि ढगांतून जमीनीवर पाऊस कोसळण्यात अडथळा निर्माण करतो. हवेच्या वाढत्या प्रदुषणामुळे वातावरणातला उष्माही वाढला असून तो भविष्यात एकूणच मानवजातीसाठी जीवघेणा ठरण्याची भीती जगभर व्यक्त केली जात आहे. पर्यावरण संरक्षण हा आता जगभरातला प्राधान्याचा विषय असून, आपल्याकडेही सरकार पातळीवर तसा दावा केला जातो, पण प्रत्यक्षात निम्न स्तरावर तसे गांभिर्य आढळून येत नाही. त्यामुळेच वसंत भोईर यांच्यासारखे सर्वसामान्य अल्पशिक्षित पण कल्पक लोक अभिजन व्यवस्थेकडून दुर्लक्षित राहतात. राज्य सरकारने समाजातील अशा व्यक्तिंचा शोध घेवून त्यांच्या विविध संशोधन, विकास प्रस्तावांसाठी आर्थिक पाठबळ उभे करण्याची आवश्यकता असताना, उलट त्यांनी केलेल्या पत्रव्यवहाराला साधी पोचही देण्याचे सौजन्य सरकारी यंत्रणा दाखवत नाही, हे खेदजनक आहे, अशी प्रतिक्रिया राज असरोंडकर यांनी याप्रसंगी दिली.