Sunday, 14 June 2015

दप्तराचं ओझं

माझ्या एका जवळच्या मित्राची मुलगी दप्तराच्या ओझ्याबाबत नेहमी तक्रार करायची. तिच्या छातीत दुखायचं. मित्राने आणि त्याच्या बायकोने ती तक्रार शाळेतही मांडली. पण जितकी वह्यापुस्तकं लागतात, तितकीच आम्ही आणायला सांगतो, असं शाळेने टोलवलं. एक दिवस ती मुलगी दप्तराचं ओझं घेवून शाळा चढली. तिसऱ्या मजल्यावरचा वर्ग. अधूनमधून ती जिन्यातील भिंतीचा आधार घेत दमछाक करीत चढत होती. वर्गात पोचली, तेव्हा ती पुरती दमली होती, रोजच्यासारखीच. पाठीवरचं दप्तर काढलं, बेंचवर ठेवलं आणि तिने दोन्ही हात दुमडून समोरच्या बाकावर ठेवून त्यावर उसंत घेण्यासाठी डोकं टेकलं, डोळे मिटले.........

आणि ती पुन्हा उठलीच नाही !!!

तीनेक वर्षांपूर्वीची ही घटना.

दप्तराच्या ओझ्याबाबत राज्य शासनाचे आदेश आहेत, पण त्याचं ना शाळा पालन करीत, ना शिक्षण विभाग अंमलबजावणी करीत.

उल्हासनगरातील बीएसबी एज्युकेशनल ट्रस्टच्या नूतन मराठी विद्यालयाने सुवर्ण महोत्सवी वर्षाचा संकल्प म्हणून यंदापासून दप्तरमुक्त शाळेची सुरूवात केली आहे. वाळवंटातील हिरवळच जणू !!!

खरं तर शाळेतून सर्व संस्कार मुलांवर होत असतात, असं म्हटलं जातं. शिक्षणाचं बाजारीकरण झालेल्या युगात संस्कार, मूल्यशिक्षणाची अपेक्षा करावी का, प्रश्न पडतो. पण हे बाजारीकरण जीवघेणं ठरल्याचं वरील एका घटनेत दिसून आलंय. शाळांना माणुसकीचा पाठ शिकविण्यासाठीही पत्रव्यवहार, आंदोलने करावी लागणार असतील, तर या समाजाचं भवितव्य काय ?