मा. सर्वोच्च न्यायालयाने काल राष्ट्रगीताबाबत नव्याने आदेश दिल्यानंतर जणूकाही या देशातील लोकांना राष्ट्रगीताबद्दल प्रचंड अनादर आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता कशी सगळ्यांची खोड मोडेल, असा अविर्भाव कित्येक पोस्टस् मधून दिसला. देशभक्तीचा ठेका ठराविक राजकीय पक्षांकडेच आहे, या मानसिकतेच्या पुढे जाऊन तो आता काही समाजांपुरताच मर्यादित आहे, असं वातावरण पध्दतशीरपणे पुढे करण्यात येत आहे. स्वत:च्या घराजवळच्या दैनंदिन प्रश्नांबद्दल, गुन्हेगारीबद्दल, भ्रष्टाचाराबद्दल कधीही ब्रसुध्दा न काढणारे फेसबुकी पगारी तावातावाने देशभक्ती शिकवत आहेत. प्रत्यक्षात ज्यांच्यासाठी देशभक्ती म्हणजे वरणावरचं तूप असतं फक्त !!! उत्तरप्रदेशातील एक भारतीय अखलाख मोहंमद याची हत्या करणाऱ्या जमावातील एकाचा मृत्यू झाल्यावर आरोपीच्या मृतदेहावर तिरंग्याचा वापर करण्यात आला, तेव्हा या तमाम देशभक्तांची वाचा बसली होती. देशासाठी लढताना शहीद झालेल्या सैनिकाला केवळ त्याच्या जातीमुळे अंत्यसंस्कारासाठी जमीन दिली जात नाही, तेव्हाही बैंकांच्या रांगात हकनाक मरणाऱ्यांना सीमेवर लढणाऱ्या जवानांचं उदाहरण देणारे गुमान गप्पगार असतात. देशाच्या मानचिन्हांच्या कायद्यानुसार पंतप्रधानांच्या छबीचा व्यावसायिक वापर करता येत नाही. इथेतर पंतप्रधानच तोंडाला रंग लावून जाहिरातीत चमकतात, पण एकाही देशभक्ताला खटकत नाही. आपल्या देशाच्या बीएसएनएलचं प्रमोशन तुम्ही कधी करणार, असा प्रश्न पंतप्रधानांना कोणी विचारत नाही. दुसऱ्याला हिनवणारी, चिथवणारी, समाजात विद्वेषाचं विष पेरणारी, अशांतता निर्माण करणारी,व राजकीय चाटुगिरी करणारी देशभक्ती या मंडळींना प्यारी आहे. जन गण मन चे सूर लांबून जरी कानावर पडले तरी जागच्या जागी पावलं थबकणारी अंगीभूत वृत्ती असणाऱ्यांना ही मंडळी त्यांच्या सोयीनुसार भूमिका न घेतल्यास आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार !!! आम्ही सांगू तेच बोललं पाहिजे, आम्ही सांगू तेच खाल्लं पाहिजे, आम्ही सांगू तेच कपडे घातले पाहिजेत, थोडक्यात आम्ही सांगू तसंच जगलं पाहिजे, हा यांचा हुकुम. तो न पाळणाऱ्यांना किंबहुना देशाच्या संविधानिक अधिकारांच्या जोरावर उडवून लावणाऱ्यांना हे देशद्रोही ठरवून मोकळे होतात. वास्तविक, सिनेमागृहात राष्ट्रगीत म्हणण्याची पध्दत संपूर्ण देशभरात नाही. महाराष्ट्रात ती २६ जानेवारी २००३ पासून सुरू आहे, म्हणजे १४ वर्षांपूर्वीपासून. केंद्र सरकारने ती पध्दत देशभरात सुरू करायला हवी होती. तसं झालं नाही. तसं ते व्हावं व त्यासोबत एक नियमावली जारी व्हावी, असा याचिकाकर्त्याचा आग्रह होता. सर्वोच्च न्यायालयाने तो मान्य केला व महाराष्ट्रात सुरू असलेली पध्दत देशभरात सरसकट लागू केली. राष्ट्रगीत कसे सादर केले जावे, कुठे सादर केले जावे, कुठे करू नये, याची मार्गदर्शक तत्व न्यायालयाने आखून दिली आहेत. राष्ट्रगीताचा ड्रामा करणाऱ्यांना न्यायालयाने चाप लावला आहे. हा आदेश राष्ट्रगीत म्हणू न इच्छिणाऱ्यांच्या, राष्ट्रगीताला उभे न राहणाऱ्यांच्या विरोधात आहे, हा अपप्रचार दिशाभूल करणारा आहे.
Wednesday, 30 November 2016
Tuesday, 1 November 2016
बाकीच्या कलमांचं काय झालं ?
आयुक्तांची बदली करा, अन्यथा कायदा बदला, अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडसावलं आहे म्हणे...कायद्यात जर आयुक्तांवर अविश्वासाची तरतूद आहे, तर तुकाराम मुंढेंची बदली झालीच पाहिजे, ही ठाकरेंची मागणी !!! मूळात, शिवसेनेचा नि कायद्याच्या अमलबजावणीचा संबंध काय, हा मूलभूत प्रश्न आहे. जणू काही कायदे पायदळी तुडवण्यासाठीच शिवसेनेचा जन्म झाला आहे, अशी या पक्षाची आजवरची वाटचाल आहे. बेशिस्तीला जातीधर्माचं, प्रांतवादाचं कोंदण देत शिवसेनेनं तिचं वेळोवेळी समर्थन केलं आहे. बुचकळ्यात टाकणारा भाग असा की नवी मुंबई महानगर पालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची सत्ता असताना त्या पक्षाऐवजी शिवसेनेच्याच जोरबैठका अधिक सुरू आहेत. बेगाना शादीमें, अब्दुल्ला दिवाना, असा हा प्रकार आहे. गणेश नाईक आणि शिवसेना यांचं विळ्याभोपळ्याचं राजकीय वैर, पण आयुक्त मुंढेंच्या विरोधात दोघे गळ्यात गळे घालून आहेत. म्हणूनच राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर महापौर झालेले सुधाकर सोनवणे मातोश्रीवर दाद मागायला जातात. कुठलाही सामाजिक अजेंडा नसलेले राजकीय पक्ष समान स्वार्थासाठी कशी एकजूट दाखवतात, त्याचं नवी मुंबई महानगर पालिका हे आणखी एक उदाहरण !!! मुंढेंना हटवण्यासाठी गणेश नाईक, सुनील तटकरे, शरद पवार यांना दगदग करू न देता, उध्दव ठाकरेंनी पुढाकार घेतला आहे. आता काम वाजवायचंच म्हटलं, तर युक्तीवाद हवाच !!! म्हणून आयुक्त बदला किंवा कायदा बदला, असा पेच ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांपुढे टाकला आहे. पण उध्दव ठाकरेंना कोणीतरी सांगायला हवं की महापालिका कायद्यात फक्त आयुक्तांवर अविश्वास आणण्याचं एकच कलम नसून आणखीही पाचशे कलमे आहेत, त्यांच्या पालनाचं काय ? शिवसेनेची सत्ता असलेल्या कोणत्या महापालिकेत अधिनियमानुसार कायदेशीर कारभार सुरू आहे ? जर नगरसेवक कायद्याचं पालन करत नसतील तर महापालिका बरखास्त करून या नगरसेवकांनाच का बदलू नये ?
Saturday, 10 September 2016
मी काहीच बोललो नाही !!!
*त्यांनी* मनपा अधिकाऱ्यांना मारहाण केली,
मी काहीच बोललो नाही,
उलट समर्थनच केले,
*त्यांनी* तहसीलदारांना मारहाण केली,
मी काहीच बोललो नाही,
उलट समर्थनच केले,
*त्यांनी* डॉक्टरांना मारहाण केली,
मी काहीच बोललो नाही,
उलट समर्थनच केले,
*त्यांनी* प्राध्यापकांना मारहाण केली,
मी काहीच बोललो नाही,
उलट समर्थनच केले,
*त्यांनी* कार्यक्रम आयोजकांना मारहाण केली,
मी काहीच बोललो नाही,
उलट समर्थनच केले,
*त्यांनी* बागेतल्या जोडप्यांना मारहाण केली,
मी काहीच बोललो नाही,
उलट समर्थनच केले,
*त्यांनी* स्कायवॉकवरील जोडप्यांना मारहाण केली,
मी काहीच बोललो नाही,
उलट समर्थनच केले,
*त्यांनी* न्यायालयात आरोपींना मारहाण केली,
मी काहीच बोललो नाही,
उलट समर्थनच केले,
*त्यांनी* विद्यार्थ्यांना मारहाण केली,
मी काहीच बोललो नाही,
उलट समर्थनच केले,
*त्यांनी* मुले पळवणाऱ्या महिलांना मारहाण केली,
मी काहीच बोललो नाही,
उलट समर्थनच केले,
*त्यांनी* बस कंडक्टरला मारहाण केली,
मी काहीच बोललो नाही,
उलट समर्थनच केले,
*त्यांनी* रिक्षाचालकाला मारहाण केली,
मी काहीच बोललो नाही,
उलट समर्थनच केले,
*त्यांनी* पाकीटमाराला मारहाण केली,
मी काहीच बोललो नाही,
उलट समर्थनच केले,
*त्यांनी* टीसीला मारहाण केली,
मी काहीच बोललो नाही,
उलट समर्थनच केले,
*त्यांनी* दुकानदाराला मारहाण केली,
मी काहीच बोललो नाही,
उलट समर्थनच केले,
*त्यांनी* फेरीवाल्यांना मारहाण केली,
मी काहीच बोललो नाही,
उलट समर्थनच केले,
*त्यांनी* परप्रांतियांना मारहाण केली,
मी काहीच बोललो नाही,
उलट समर्थनच केले,
*त्यांनी* गोमांस बाळगणाऱ्यांना मारहाण केली,
मी काहीच बोललो नाही,
उलट समर्थनच केले,
*त्यांनी* वर्गणी दिली नाही म्हणून मारहाण केली,
मी काहीच बोललो नाही,
उलट समर्थनच केले,
*त्यांनी* हप्ता दिला नाही म्हणून मारहाण केली,
मी काहीच बोललो नाही,
उलट समर्थनच केले,
*त्यांनी* कित्येक वेळेला माझ्यासमोर कित्येकांना मारहाण केली,
मी काहीच बोललो नाही,
उलट समर्थनच केले,
*त्यांनी* पोलिसांना मारहाण केली,
मला सांगा, यात नवल वाटण्यासारखं काय आहे ?
*राज असरोंडकर*
Monday, 5 September 2016
मोमबत्तीवाला गणपती !!!
हा मोमबत्तीवाला गणपती उल्हासनगरातील पाच नंबर कैम्पात आहे. त्यासमोर मेणबत्ती लावून कामना केली की ती पूर्ण होतेच, मग ते नोकरीधंद्यापासून संततीप्राप्तीपासून काहीही असो. गणपती पावतो. कारण ती नुसती गणपतीची मूर्ती नाही, तर साक्षात गणपतीच आहे...अस्सल !! अगदी उल्हासनगरी असला तरी...
विषय इथेच संपत नाही. उल्हासनगर रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर या गणरायाची महती सांगणारे दोन जाहिरात फलक काढून टाकायला सांगायला मी सीएनसी कडे गेलो, तर तो म्हणाला, *मला स्वत:ला या गणपतीचा अनुभव आला आहे. जो लिखा है, वो सहीं है...*
मी म्हटलं, टिटवाला, सिध्दिविनायक से पॉवरफुल है क्या बोलो. आप बोलते है, तो मैं खुद अपने पैसेसे वैसा बोर्ड लगाता हुं, टिटवाला, सिध्दिविनायकसेभी पॉवरफुल गणपती उल्हासनगरमें..
तो म्हणाला, ऐसा हम नहीं बोल सकते..
मग मी म्हटलं, आज मेरी आपसे जबानी शिकायत है, कल लिखित करूंगा, वोभी आप के खिलाफ कि आप अंधश्रध्दा को बढावा दे रहे हो..
निकालता हुं, म्हणालाय. बघुया काय होतंय, नाहीतर आहे मग, अव्यवस्थेला व्यवस्थित उत्तर !!!
*कायद्याने वागा लोकचळवळ*!!!
Saturday, 3 September 2016
माजोरडेपण कोण पोसतंय ?
तर साहेब ....
ठाण्यात कारचालकाच्या अपघातात एक वाहतूक पोलीस मृत्यूच्या दाढेतून परतला..
झालं काय ....
शनिवारी, ३ सप्टेंबर रोजी ठाण्यात तीन हात नाका इथे कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलिस नरसिंग महापुरे यांनी एका नो एन्ट्रीत विरूध्द दिशेने भरधाव जाणाऱ्या कारला अडवण्याचा प्रयत्न केला.
त्या निरागस , सालस , कूकल बाळ , नादान आणि भोळ्या असलेल्या "योगेश भामरे " या हिंदू तरुणाकड़े लाईसन्सदेखील नव्हतं. महापुरे गाडी थांबवण्याच्या प्रयत्नात असताना भामरे याने सरळ त्यांच्या अंगावरच गाडी घातली व जवळजवळ अर्धा किमी पर्यंत महापुरेंना फरफटत नेलं. गाडीच्या बोनेटला धरून राहिल्याने महापुरेंचा जीव वाचला. योगेश भामरेला पोलिसांनी अटक केली आहे.
हिंदुत्ववादाला धक्का लागेल, असं काहीच नाही करायचं ठरवलं आहे. जय महाराष्ट्र .... शान्तिप्रिय समाजाच्या हातूनही चुकून अशा घटना घडू शकतात .... या जागी कार्यकर्ते मुस्लिम किंवा दलित संघटनांचे असते तर आता पर्यन्त सनातन आणि हिंदुत्ववादी लोकांनी सरकारी व्यवस्थेची आणि संघटनेची आबरू काढण्यासाठी जीभेला चाक़ू धार आणली असती .... ठाण्यात मोर्चा काढला असता. पण हा काही अहमद महंमद अली कुरेशी नाही, हिंदू आहे, म्हणून कोणीच राजकीय नेता ब्र काढत नाही ...आता यांच्या जबड्याला आणि हाताला लकवा मारला आहे.
नरसिंग महापुरे यांना दीर्घायुष्य लाभो !!!
अशी पोस्ट आपण ठाण्यातील घटनेसंदर्भात फिरवली तर ...
त्यासारखा दुसरा मूर्खपणा नाही. क्षणिक धार्मिक भावनेच्या भरात येवून अशा घटनांचं मूल्यमापन करताच येत नाही. कारण या घटना धार्मिक विद्वेषातून घडलेल्या नाहीत. त्या अपघातीही नाहीत. तर हेतूत: घडवलेल्या आहेत, माजोरड्या प्रवृत्तीतून. ही प्रवृत्ती नियम-कायद्यांचा, संविधानिक व्यवस्थेचा अनादर करणारी आहे आणि जातधर्मभाषाप्रांतापलिकडे सर्व भारतीयांत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इशारा दिला होता की असंविधानिक मार्गांचा अवलंब वाढला तर देशात अराजक माजेल.
आज देशात वेगळी परिस्थिती काय आहे ? अराजकच आहे !!! कोणीही सोमेगोमे उठतात आणि कायदा हातात घेतात. संविधानिक व्यवस्थेला आव्हान देतात. शहाबानो प्रकरण असो की अगदी अलिकडचा दहीहंडीबाबतचा किंवा मशिदींवरील भोंग्यांबाबतचा, मंदिर-मस्जिद प्रवेशाबाबतचा मा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असो, त्यांचा खुला अनादर केला जातो, कायदा मोडणाऱ्यांना गौरवलं जातं, दोनचार मतांच्या लालसेपायी इथली अख्खी तरूण पीढी भरकटवली जाते. सण, उत्सवांच्या नावाखाली धार्मिक उन्मादाला उत्तेजन देताना, समाजात धार्मिक विद्वेष पसरवून स्वार्थी आणि अनेकदा सवंग लोकप्रियतेचं तोडफोडीचं राजकारण करताना राजकीय पक्षच नियमकायद्यांना फाटा देत असतात. त्यातूनच पोलिसांवर, सरकारी अधिकाऱ्यांवर, डॉक्टरांवर, शिक्षकांवर हल्ला चढवणारी माजोरडी प्रवृत्ती जन्म घेते.
गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात घडलेल्या पुढील घटना पाहा...
*१९ फेब्रुवारी,२०१६*
लातूरमधील पानगावात शिवजयंतीच्या निमित्ताने भगवा झेंडा फडकवण्यास विरोध केलेल्या पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी १७ जणांना अटक करण्यात आली असून त्यात अल्पवयीन तरुणांचाही समावेश आहे.
*१ जुलै, २०१६*
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आरोपींकडून पोलिसांना मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. खासगी गाडीतून नेण्याची मागणी करत आरोपींनी दोन पोलिसांना जोरदार मारहाण केली असून या मारहाणीत पोलीस गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी त्यांना गाडीतून घेऊन निघालेल्या पोलिसांनाच नाशिकमध्ये सात कैद्यांनी मारहाण केली.
*२९ फेब्रुवारी, २०१६*
विरारमध्ये चार महिला पोलिसांना स्टेशनमध्ये घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. अर्नाळा सागरी पोलिस स्टेशनमध्ये ही दोन बहिणींनी पोलिसांना मारहाण केली. प्रज्ञा सिंह आणि गार्गी सिंह अशी या आरोपी महिलांची नावं आहे.
*२२ डिसेंबर, २०१५*
डोंबिवली एमआयडीसीतील बेकायदा इमारत तोडण्यास गेलेल्या एमआयडीसीच्या अभियंत्याला भाजपचे नगरसेवक महेश पाटील व त्यांच्या समर्थकांनी बांधकाम तोडण्यास मज्जाव करून मारहाण केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाही या मारहाणीचा फटका बसला.
*५ ऑगस्ट, २०१६*
वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस हवालदार महिलेला मारहाण आणि विनयभंगाचा प्रकार काही दिवसांपूर्वीच घडलेला असतांना ठाण्यातील उपवन भागात दोन मद्यपी तरुणांनी चार वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी रोहन राजीवडे आणि सागर मांडवकर यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणो, पोलीसांना मारहाण करणो यासह विविध कलमांखाली वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*२५ ऑगस्ट, २०१६*
बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या आवारात विनापरवाना वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करणार्या तरुणांच्या टोळक्याला रोखण्यासाठी गेलेल्या तीन पोलिसांना या टोळक्याने जबरदस्त मारहाण करत गंभीर जखमी केले. हा प्रकार बुधवारी (दि.24) सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडला. यामध्ये सहाय्यक फौजदार अर्जुन तुकाराम व्यवहारे, कॉन्स्टेबल व्ही. एस. वाघमोडे व राजेश साहेबराव गायकवाड हे पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले.
*६ जून, २०१६*
वाशीतील इनॉर्बिट मॉलमधील पबमध्ये पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणींच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी होऊन हाणामारीची घटना घडली. या घटनेनंतर मद्यधुंद तरुणींनी वाशी महिला पोलिसांना धक्काबुक्की केली. यात महिला पोलिस किरकोळ जखमी झाल्या आहेत.
*२९ सप्टें, २०१५*
औरंगाबादमध्ये ‘नो पार्किंग’मधील रिक्षा काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून रिक्षा चालकासह त्याच्या भावाने दोन पोलिसांना दगडाने मारहाण केली. त्यानंतर स्वतःच रिक्षा पेटवून दिली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, अन्य एका आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
*२० फेब्रुवारी, २०१६*
पुणे येथील खडक पोलीस ठाण्यात चौकशीच्या पोलिसांनाच धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला आहे. त्याचसमवेत सहकारनगर भागात वाहतुकीचे नियम मोडून एकाच दुचाकीवर तीन तरुण जात होते. त्यांना अडवणार्या वाहतूक पोलिसालाच शिवीगाळ करून धमकावल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटना २० फेब्रुवारी या दिवशी घडल्या आहेत.
*२५ जून, २०१६*
औरंगाबाद - कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या जनावरांचा ट्रक अडवून गोशाळेत नेणाऱ्या पोलिसाला जमावाने बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर ट्रक सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या अंगावर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सिल्लोडच्या नगरसेवकासह ४० आरोपींविरोधात सिल्लोड शहर, ग्रामीण, आणि वडोद बजार पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*१० फेब्रुवारी, २०१६*
किरकोळ कारणावरून पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना मारहाण केल्याप्रकरणी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पुतण्या सत्यशील याच्यासह त्याच्या 9 साथीदारांना आज अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
*शहीद विलास शिंदे प्रकरणात मोर्चा काढणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबियांकडून या सर्व घटनांची नोंद घेतली गेली आहे काय ? आपण गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात बोलणार आहोत की विशिष्ट जातीधर्माच्या ?*
शेवटी कुठवर आपण स्वत:ची फसवणूक करून घेणार आहोत. *या गुन्हेगारी प्रवृत्ती त्यांचे जातधर्म भेद विसरून हातात हात घालून आपल्या घरात शिरेपर्यंत ?????*
*राज असरोंडकर*
कायद्याने वागा लोकचळवळ
गणराज रंगी नाचतो !!!!
*गणराज रंगी नाचतो !!!*
लता मंगेशकरांच्या आवाजातली कोणतीही भक्तीगीतं ऐकताना मन प्रसन्न होऊन जातं, अगदी आपण नास्तिकबिस्तिक असलो तरीही. इतरांचं माहित नाही, निदान माझातरी हा अनुभव आहे. भक्तीगीतातल्या संगीतात तल्लीन होणं, हे गाण्यावरच्या प्रेमापोटीही होत असेल कदाचित. पण जिथे आनंद आहे, तिथे कारणं कशाला शोधत उहापोह कशाला करीत बसायचा ? मनसोक्त आनंद लुटावा इतकंच. हा आनंद डीजेच्या बेसूर कर्णकर्कश्य आवाजाने आपण का गमावून बसतो कळत नाही. नास्तिक जर भक्तीगीतांतल्या संगीताने डोलत असतील, तर भक्तांची तर ब्रम्हानंदी टाळी लागायला हवी !!! पण तसं होताना दिसत नाही. उत्सवाच्या नावाखाली भक्तीचा धुडगूस सुरू आहे.
*समाज प्रबोधनासाठी उत्सव*
*काळाच्या ओघात अमान्य झाले,*
*भक्तीच्या बाजारात*
*देवसुध्दा सामान्य झाले,*
*सणाचं पावित्र्य की काय,*
*गेलं वाहून पुरात,*
*खंडणीखोरांच्या आयोजनात*
*गोंगाट लोकमान्य झाले..*
अशी सण-उत्सवांची अवस्था झालीय. राजकीय मंडळी त्यांचं अपयशाचं पाप झाकण्यासाठी या उत्सवांना उन्मादी स्वरूप देऊ पाहताहेत. हे थांबायला हवं. सण, उत्सव समाजात बंधुतेचं, उत्साहाचं, आनंदाचं प्रसन्न असं वातावरण निर्माण करण्यासाठी आहेत, गढुळ करण्यासाठी नाहीत.
तेव्हा, *डीजेला नकार द्या*. शांताबाई, चिकनी चमेलीला फाटा द्या. गणराज रंगी वाजवा. गजानना श्री गणराया वाजवा. ओंकार स्वरूपा वाजवा. विठ्ठल आवडी, खेळ मांडियला, आनंदाचे डोही वाजवा किंवा अगदी प्रल्हाद शिंदेचं पाऊले चालती वाजवा.
वातावरण आल्हाददायक होऊद्या. *च्यायलामायलातून बाहेर पडलेली सुमधूर मराठी कानावर पडूद्या.*
सोबत प्रबोधनात्मक व्याख्यानं होऊद्या. हस्ताक्षर, निबंध, वक्तृत्व स्पर्धा होऊद्यात. सामान्य ज्ञान स्पर्धा होऊद्यात. नुसता सार्वजनिक नव्हें तर सार्वजनिक कौटुंबिक स्वरूप येऊद्या यंदाच्या गणेशोत्सवाला.
यंदाच्या गणेशोत्सवात इतकं करून पाहाच. हे कधी घडेल, जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव लोकांची धर्माच्या नावावर माथी भडकवणाऱ्या राजकीय गुलामगिरीतून बाहेर पडेल तेव्हाच...
आणि हो, *गणपती राजाबिजा काही नसतो*, तो फक्त गणपती असतो. कोणा शेटचा असला तरी आणि गल्लीबोळातला असला तरीही..
*बुध्दिच्या देवतेचा उत्सव साजरा करताना आपला विवेक जागृत असुद्या.*
यंदाचा उत्सव गोंगाट टाळून स्पर्धांचं आयोजन, व्याख्यानंसहित भक्तीसंगीतमय करायचा असेल तर मार्गदर्शनासाठी जरूर संपर्क करा.
*राज असरोंडकर*
कायद्याने वागा लोकचळवळ
9850044201
7666644201
kaydyanewaga@gmail.com
Monday, 29 August 2016
विरोध उन्मादाला !!!
*सण,उत्सवांना आलेलं विकृत स्वरूप मतांसाठीच्या राजकारणातून आलेलं आहे, त्यामुळे ते टिकवून ठेवण्यासाठी राजकारणी धडपडणारच !!!*
त्यांच्यामागे लागून आपण सण, उत्सवातला निखळ आनंद, बंधुभाव, संस्कृती गमावून बसायचं काय, हे जनतेने ठरवायला हवं.
*सजवलेल्या रश्शीवरून दहीहंडी क्रेनला लटकू लागली,*
*ढोलताशांची जागा कर्कश्य डीजेंनी घेतली,*
*पारंपरिक गीतसंगीताची जागा अचकटविचकट गाण्यांनी घेतली,*
*गोविंदा रे गोपाळा च्या जागी शांताबाई आली,*
*धार्मिक भावना, श्रध्दांचा लीलावी बाजार झाला,*
*उत्सवाच्या जागी उन्माद आला,*
*सणाचा जीवघेणा खेळ झाला,*
थर वाढत चालले आणि लहानग्यांचे जीव पणाला लावण्याइतपत राजकारणाचे थर खाली आले,
*तरी कसल्या परंपरेच्या बाता मारताेय आपण ?*
सर्वसामान्यांचं जीणं हराम करणारा, दैनंदिन जनजीवन विस्कळीत करणारा, वृध्द, बालके, रूग्ण यांना होणाऱ्या त्रासाची पर्वा न करणारा उत्सव, कोणत्याही जातीधर्माचा असो, त्यातला उन्माद मोडून काढायची जबाबदारी सर्वप्रथम सरकारची असते. सरकार अपयशी ठरलं, तर न्यायालय नाक खुपसणारच !!!
गोहत्याबंदी किंवा शहाबानो प्रकरणात आपण कोणीच असे म्हटले नव्हते, की न्यायालय नाक खुपसतंय !!!
न्यायालयाचे निर्णय म्हणजे स्वार्थासाठी ठेकेदारांच्या हितार्थ घेतलेले महापालिकांतील स्थायी समितीचे निर्णय वाटतात की काय राजकीय पक्षांना ?
सण,उत्सवांच्या आड इथली संविधानिक व्यवस्था मोडीत काढून धर्मव्यवस्थेला देशापेक्षा वरचढ ठरवायचा डाव, आपण जातपातधर्मभाषाप्रांत भेद विसरून हाणून पाडायलाच हवा. *अन्यथा बंद करा १५ ऑगस्ट नि २६ जानेवारीला तिरंग्यांचे प्रोफाईल फोटो लावणं !!!*
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची जर देशात खुली अवमानना व्हायला लागली, तर देशात अराजक यायला वेळ लागणार नाही. *ही अराजकता भारताचा पाकिस्तान करायला वेळ लावणार नाही !!!*
*विरोध उत्सवाला आणि त्यातल्या उत्साहाला नाही, उन्मादाला आहे, हे लक्षात घ्या.*
*राज असरोंडकर*
कायद्याने वागा लोकचळवळ