Saturday, 3 September 2016

गणराज रंगी नाचतो !!!!

*गणराज रंगी नाचतो !!!*

लता मंगेशकरांच्या आवाजातली कोणतीही भक्तीगीतं ऐकताना मन प्रसन्न होऊन जातं, अगदी आपण नास्तिकबिस्तिक असलो तरीही. इतरांचं माहित नाही, निदान माझातरी हा अनुभव आहे. भक्तीगीतातल्या संगीतात तल्लीन होणं, हे गाण्यावरच्या प्रेमापोटीही होत असेल कदाचित. पण जिथे आनंद आहे, तिथे कारणं कशाला शोधत उहापोह कशाला करीत बसायचा ? मनसोक्त आनंद लुटावा इतकंच. हा आनंद डीजेच्या बेसूर कर्णकर्कश्य आवाजाने आपण का गमावून बसतो कळत नाही. नास्तिक जर भक्तीगीतांतल्या संगीताने डोलत असतील, तर भक्तांची तर ब्रम्हानंदी टाळी लागायला हवी !!! पण तसं होताना दिसत नाही. उत्सवाच्या  नावाखाली भक्तीचा धुडगूस सुरू आहे.

*समाज प्रबोधनासाठी उत्सव*
*काळाच्या ओघात अमान्य झाले,*
*भक्तीच्या बाजारात*
*देवसुध्दा सामान्य झाले,*
*सणाचं पावित्र्य की काय,*
*गेलं वाहून पुरात,*
*खंडणीखोरांच्या आयोजनात*
*गोंगाट लोकमान्य झाले..*

अशी सण-उत्सवांची अवस्था झालीय.   राजकीय मंडळी त्यांचं अपयशाचं पाप झाकण्यासाठी या उत्सवांना उन्मादी स्वरूप देऊ पाहताहेत. हे थांबायला हवं. सण, उत्सव समाजात बंधुतेचं, उत्साहाचं, आनंदाचं प्रसन्न असं वातावरण निर्माण करण्यासाठी आहेत, गढुळ करण्यासाठी नाहीत.

तेव्हा, *डीजेला नकार द्या*. शांताबाई, चिकनी चमेलीला फाटा द्या. गणराज रंगी वाजवा. गजानना श्री गणराया वाजवा. ओंकार स्वरूपा वाजवा. विठ्ठल आवडी, खेळ मांडियला, आनंदाचे डोही वाजवा किंवा अगदी प्रल्हाद शिंदेचं पाऊले चालती वाजवा.
वातावरण आल्हाददायक होऊद्या. *च्यायलामायलातून बाहेर पडलेली सुमधूर मराठी कानावर पडूद्या.*

सोबत प्रबोधनात्मक व्याख्यानं होऊद्या. हस्ताक्षर, निबंध, वक्तृत्व स्पर्धा होऊद्यात. सामान्य ज्ञान स्पर्धा होऊद्यात. नुसता सार्वजनिक नव्हें तर सार्वजनिक कौटुंबिक स्वरूप येऊद्या यंदाच्या गणेशोत्सवाला.

यंदाच्या गणेशोत्सवात इतकं करून पाहाच. हे कधी घडेल, जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव लोकांची धर्माच्या नावावर माथी भडकवणाऱ्या राजकीय गुलामगिरीतून बाहेर पडेल तेव्हाच...

आणि हो, *गणपती राजाबिजा काही नसतो*, तो फक्त गणपती असतो. कोणा शेटचा असला तरी आणि गल्लीबोळातला असला तरीही..

*बुध्दिच्या देवतेचा उत्सव साजरा करताना आपला विवेक जागृत असुद्या.*

यंदाचा उत्सव गोंगाट टाळून स्पर्धांचं आयोजन, व्याख्यानंसहित भक्तीसंगीतमय करायचा असेल तर मार्गदर्शनासाठी जरूर संपर्क करा.

*राज असरोंडकर*
कायद्याने वागा लोकचळवळ
9850044201
7666644201
kaydyanewaga@gmail.com

No comments:

Post a Comment