नेत्यांनो, आमच्या शहरातील मैदानं कुठायंत ?
______________________________
परवा सर्व नियमकायदे धाब्यावर बसवून दहीहंडीचा सण साजरा झाला. आता गणेशोत्सव येवून ठेपलाय. पाठोपाठ नवरात्रौत्सव. जयंत्या, ऊरुस, मेळे, शिबीरं सगळं रस्त्यावरच ठाण मांडून केलं जातं.
आधीच अस्ताव्यस्त वाढलेली शहरं, अरुंद रस्ते, रस्ते कसले, बोळ नुसत्या, प्रमाणाबाहेर वाढलेली वाहतूक, तितकीच वाढलेली बेशिस्ती, यांमुळे आधीच जनजीवन धकाधकीचं, गर्दीचं, चेंगराचेंगरीचं झालं आहे.
त्यात ही अधिकची कोंडी आली की जीव हैराण होतो. निवडणुकीच्या काळात तर, निवडणुका नको, पण हैदोस आवर, असं म्हणायची पाळी येते. बरं, हे सगळं करतं कोण, तेच लोक, जे विकासाच्या भुलथापा मारतात. यांच्या विकासाला ना नियोजन, ना आकारऊकार !!! दे दान, सुटे गिराण या प्रवृत्तीचे हे लोक. कमिशनवर आधारित विकासाचं नियोजन करणारे भुरटे चोर !!!
खाजगीकरणाच्या नावाखाली शहरातील मोक्याचे भुखंड अप्रत्यक्ष विकण्याचा जणू परवानाच मिळालाय यांना. सद्या तर जागांना सोन्याचा भाव आल्याने त्या विकासाच्या नावाखाली बिल्डरांच्या धनदांडग्यांच्या घशात कशा घालता येतील, हा एकच ध्यास स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधींना लागलेला आहे. अनेक मोकळे भुखंड गिळंकृत करुन झाले. बाकीचे करायचेच. नद्या अतिक्रमित केल्या. डोंगर पोखरले, पण यांची भूक काही संपत नाही.
मोकळ्या मैदानांवर सणासुदींची वहिवाट सुरु झाली आणि नेमक्या त्याच भुखंडावर एखाद्या बिल्डरचा डोळा असला तर व्हायची की पंचाईत !!! जनतेचा सार्वजनिक हक्क प्रस्थापित होऊ नये, त्यांचं लक्षच मोकळ्या जागांकडे जाऊ नये म्हणून आधी मोठाल्या गृहसंकुलांचा घाट घातला गेला आणि आता तीव्र करण्यात येत होतं, रस्त्यांवरच्या उत्सवांचं राजकारण !!!
लोकांच्या भोळ्याभाबड्या धार्मिक भावनांचा वापर करुन केवळ राजकारणच पोसलं जात नाहीये, तर तुंबड्याही भरल्या जाताहेत. लोकांना वाटतंय, आपला बुडणारा धर्म हे सावरताहेत, पण प्रत्यक्षात स्वार्थी राजकारणासाठी धर्मच काय, तुम्हालाआम्हाला बुडवायला हे लोक मागेपुढे पाहणार नाहीत.
तेव्हा वेळीच जागे व्हा. आपापल्या भागांतील मोकळ्या जागांवर भुमाफियांची नजर पडण्याआधीच त्या जागांचा वापर सुरु करा. सण, उत्सव, मेळ्यांसाठी या जागांचा आग्रह धरा. कला, क्रीडा, प्रदर्शने, शतपावली, निवांत गप्पांसाठी मैदानांचा वापर सुरु करा. मैदानांवर सार्वजनिक वहिवाट प्रस्थापित करा. कोणत्याही परिस्थितीत मैदानांचं खाजगीकरण होऊ देऊ नका. अशा प्रस्तावांना कडाडून विरोध करा. मोकळ्या जागा म्हणजे शहरांचा मोकळा श्वास आहेत. तो गमावू नका, घाणेरड्या स्वार्थी राजकारणाचे बळी होऊ नका. प्रत्येक शहरात कायद्याने वागा लोकचळवळीची मैदानं बचाव समिती स्थापन करा. लोकप्रतिनिधींना ठणकावून विचारा, आम्हाला खेळायला, निवांत फिरायला, सणउत्सव साजरे करायला मैदानं कुठायंत ???
_______________________________
राज असरोंडकर
कायद्याने वागा लोकचळवळ
kaydyanewaga@gmail.com