Sunday, 29 November 2015

स्त्रियांनी मंदिरांवर बहिष्कार करावा !!!!





एका महिलेने शनिशिंगणापूर मंदिरात प्रवेश काय केला, त्यावरून गदारोळ माजला आहे. कोणाला वाटेल धर्माच्या रक्षणार्थ हा गोंधळ सुरु आहे. बाई चौथऱ्यापर्यंत पोचलीच कशी, म्हणून सात सुरक्षारक्षक निलंबित झाले. मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. निषेध रैली काढण्यात आली. वास्तविक, बाई चौथऱ्यापर्यंत आल्याविरोधात प्रतिक्रिया देवाने द्यायला हवी होती. देवाने ती बाई चौथऱ्यावरच भस्मसात करुन टाकायला हवी होती. पण तसं झालं नाही. पुढेही देव त्या बाईचं काही वाकडं करेल, याची सूतराम शक्यता नाही, याची धर्ममालकांना खात्री आहे. शनिशिंगणापूरसारखा देवांचा बाजार भीतीवर, दहशतीवर उभा आहे. बाई त्या दहशतीवरच जाऊन उभी राहिली, त्यामुळे देवाच्या नावाने चाललेल्या त्या दुकानाचं अस्तित्वच धोक्यात आलंय. गदारोळाने ते अस्तित्व टिकवण्याची धडपड सुरु आहे. हळुहळू एका पाठोपाठ एक सगळ्याच दुकानांची दहशत संपत गेली, तर करोडोंच्या उलाढालीचं काय ? प्रश्न केवळ धार्मिक पाया उद्ध्वस्त होण्याचा नाही, तर त्या पायावर उभ्या राहिलेल्या जातीयवादी राजकारणाचाही आहे. निषेध रैली ही राजकीय मेंदूतूनच आलेली कल्पना. ज्यांना समाज मागे न्यायचाय, ते या संधीचा फायदा स्त्रियांना दुय्यम ठरवणारी सनातनी मानसिकता पुन्हा नव्याने घट्ट करण्यासाठी घेताहेत. पण खरंतर आधुनिकतेशी नातं सांगणाऱ्या समस्त महिलांनी या घटनेचा निषेध समस्त प्रार्थनास्थळांवर बहिष्कार करुन करायला हवा. मग ती कोणत्याही जातीधर्माची असोत !!! बाईच्या स्पर्शाचा विटाळ होतो, म्हणून लोक गाईच्या दुधाचा अभिषेक करणार असतील, तर यात बाईच्या दुधाशी केलेली बेईमानी स्पष्ट दिसते. या बेईमानीचा बदला घ्यायलाच हवा. मंदिरमशिदीदर्गे जिथे जिथे स्त्रियांना प्रवेशबंदी , दर्शनबंदी आहे, तिथला प्रवेश स्त्रियांनीच झिडकारायला हवा !!!  स्त्रियांना कस्पट समजणारी कुजकट मनोवृत्ती उघड झाली. आता आपणही आपला पत्ता उघडायलाच हवा. स्त्रियांच्या शोषणाची मूळं धर्मस्थळातच लपलेली आहेत. ती तिथूनच उखडायला हवीत.

- राज असरोंडकर
कायद्याने वागा लोकचळवळ

Friday, 27 November 2015

यापुढे शिव्या बंद !!!

आज महामानव ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिन. २८ नोव्हेंबर १८९० रोजी ज्योतिबांनी आपला श्वास रोखून धरला, तो आजतागायत !!!

किती काम, किती कष्ट, किती दगदग !!! बरं, त्यात स्वार्थ काय ? तर काहीच नाही. सारी धडपड समाजासाठी !!!

ज्योतिबा हे सगळं का करु शकले, तर जे मनाला खटकलं, ते त्यांनी तेव्हाच्या वर्तमानातच बोलून दाखवलं. त्याला कडाडून विरोध केला. टीकाटिप्पणी, शिवीगाळ झेलली. सुधारणा भाषणांपुरती मर्यादित न ठेवता, ती प्रत्यक्षात अवतरवली. चांगल्या भविष्यासाठी वर्तमानाशी विसंगत भुमिका घेऊन जगायला मोठं धाडस लागतं. आपण बघतो की क्रांतीच्या खूप मोठ्या बाता मारणारे लोक त्यांच्या घराशेजारची गुंडगिरी, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, गैरप्रकार, कायद्याचं उल्लंघन, प्रशासकीय मनमानी याविरोधात तोंडही उघडत नाही. प्रत्येक झोपडपट्टीत फुले-आंबेडकरांचा वारसा सांगणारे शेकडो कार्यकर्ते असतात, पण स्थानिक दारुचे गुत्ते, मटक्याचे अड्डे याबाबत मूग गिळून असतात. तीच गत फ्लैटमध्ये राहणाऱ्या तथाकथित विचारवंतांची असते. अवघ्या ५०-१०० लोकसंख्येच्या सोसायटीतही कधीही आवाज न उठवणारे हे लोक भाषणांतून मात्र क्रांतीच्या तुताऱ्या फुंकत असतात.

घराशेजारच्या मनपा शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना प्राथमिक सुविधा तरी आहेत का, याची साधी चौकशीही न करणाऱ्या लोकांना वर्षातून एकदा शिक्षकदिनाची मागणी करायला जोर येतो.

प्रश्न शिक्षणाचा असो, स्त्रियांच्या अधिकारांचा असो विधवा पुनर्वसनाचा की अंधश्रध्देविरोधात कठोर प्रहार असोत, ज्योतिबा फुलें नेहमीच काळाच्या दोन पावले पुढे चाललेले आहेत.

फुले-आंबेडकरी विचार हा स्त्रीसक्षमीकरणाचा, स्त्रीसन्मानाचा विचार आहे. या महामानवांकडे एक निरोगी पुरुषभान होतं, म्हणूनच या विचारांत स्त्रीचळवळीची बीजं रुजलेली आपल्याला दिसतात. आपण जर या महामानवांचे स्वत:ला पाईक म्हणवत असू, तर त्यांच्या विचारांची कास प्रत्यक्षात धरणं आवश्यक आहे.

मर्दुमकी, हिजडे, बायल्या, बांगड्या भरा असे व तत्सम शब्दप्रयोग पुरुषवर्चस्वाचा पुरस्कार करणारे आहेत. ते हेतूत: टाळले पाहिजेत.

आणि सर्वात महत्वाचं समाजात खुलेपणाने दिल्या जाणाऱ्या शिव्या. या शिव्या आयाबहिणींवरुन दिल्या जातात. याचाच अर्थ त्या स्त्रीवाचक म्हणजेच स्त्रीयांना अवमानित करणाऱ्या आहेत. फुले-आंबेडकरी विचारांत शिव्यांना स्थान असता कामा नये, किंबहुना शिव्यांना प्रखर विरोध व्हायला हवा.

कोणत्याही परिस्थितीत, कितीही संतापजनक अवस्थेत कळतनकळत कोणाच्याही आयाबहिणींचा शिवराळ अवमान होणार नाही, याचा संयम म्हणजेच फुले-आंबेडकरी विचार आहे !!!

चला, ज्योतिबा फुलेंच्या यंदाच्या स्मृतीदिनी यापुढे कधीही चुकूनही शिव्या न देण्याचा निर्धार करुया. शिव्या द्यायच्या नाहीतच, सहनही करायच्या नाहीत !!!

- राज असरोंडकर
कायद्याने वागा लोकचळवळ