Monday, 7 March 2016

अशीही शिवभक्ती !!!

अशीही शिवभक्ती !!!
_________________

कदाचित शिवभक्तांना आठवणार नाही, पण १९९३ ची महाशिवरात्र माझ्या चांगली लक्षात आहे. उल्हासनगरातील संभाजी चौकात एका भुखंडातून शंकराची मूर्ती निघाली होती. बातमी वाऱ्यावर पसरली आणि बघता बघता ( नेहमीप्रमाणे ) महिला पुजेचं ताट घेवून संभाजी चौकाकडे धावल्या होत्या. नारळांचा, हाराफुलांचा खच पडला. तीन-चार हजार रुपये जमा झाले. लगोलग मंदिर बांधण्याची तयारीही सुरु झाली.

संभाजी चौकातील एका महिलेला स्वप्नात येवून शंकर भगवान सांगायचे की मी इथेच कुठेतरी आहे. महाशिवरात्रीच्या पहाटेला त्या महिलेला संभाजी चौकातील सत्यसाई निकेतन शाळेसमोरची जागा स्वप्नात दिसली. खोदकाम सुरु झालं नि मूर्ती सापडली. चमत्कारच म्हणावा !!!

पण तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी यांनी ते बांधकाम पाडलं आणि सदर प्रकरणाची चौकशीही केली. एका बिल्डरने एका राजकीय पक्षाला हाताशी धरुन भुखंड हडपण्याची योजना बनवली होती व त्यासाठी शंकराच्या मूर्तीचा लबाडीने वापर करण्यात आला होता. एक स्थानिक नेता तर म्हणायचा, एकवेळ मर्डर होईल, पण इथे मंदिर बनणारच !!!

मर्डर झाला, पण लोकांच्या श्रध्देचा, धार्मिक भावनांचा, लोकांच्या विश्वासाचा !!!

आज त्या जागी सिंधु मंगल कार्यालयाची इमारत उभी आहे. ज्यांना जे पदरात पाडून घ्यायचं होतं, त्यांनी ते घेतलं. वाऱ्यावर फेकली गेली भोळ्या शंकराची मूर्ती !!! तेवीस वर्षे झाली, त्या मूर्तीला मंदिर काही भेटलेच नाही !!!

खुलेआम देवाचा, धर्माचा, लोकभावनेचा, श्रध्देचा गैरवापर झाला, पण याविरोधात बोलणारा, आवाज उठवणारा एक ' माई का लाल' शिवभक्त गेल्या तेवीस वर्षात निपजला नाही.

अनधिकृत बांधकामांना हिंदू प्रार्थना मंदिराचा फलक लावून कारवाई टाळणारे व मागाहून तो फलक हटवून जागा हडपणारे लोक इतरांना कट्टर हिंदुत्ववाद शिकवतात, तेव्हा राग येतो, तो असल्या भोंदू लोकांच्या मागे जाणाऱ्या भोंदू जनतेचा...

छोट्या छोट्या गोष्टींवरुन धार्मिक भावना दुखावल्या म्हणून, गावं-शहरं पेटवणारे, दंगली घडवून कित्येकांचे संसार उद्ध्वस्त करणारे तथाकथित कट्टरवादी अशा प्रकरणात कुठल्या बिळात शेपूट घालून बसलेले असतात, कुणास ठाऊक ?

- राज असरोंडकर
कायद्याने वागा लोकचळवळ

Thursday, 3 March 2016

आंबेडकरी रिपब्लिकन

सरसेनापतीसारखा पुढारी, सभासद , मुलभूत योजना व शिस्त यांचा समावेश असलेली संघटना, ध्येय, धोरण आणि तत्वज्ञान, कार्यक्रम, राजकिय डावपेच आणि मुत्सद्देगिरी या बाबींच्या समावेशातून पक्ष बनतो.

विशिष्ट ध्येयवादाने प्रेरित होऊन मतदारांनी केलेली संघटना म्हणजे पक्ष अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्याख्या केली आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष कॉंग्रेसला पर्याय म्हणून निर्माण व्हायचा होता. देशातील छोट्या छोट्या पक्षाचं विलीनीकरण या एका पक्षात करून कॉंग्रेसला पर्याय अशी एकच संयुक्त आघाडी असावी , हा बाबासाहेबांचा प्रयत्न होता. आज रिपब्लिकन पक्षाचेच छोट्या छोट्या पक्षात तुकडे करून बाबासाहेबांचं स्वप्न पार धुळीला मिळवलं गेलं.

आपल्या स्वप्नपूर्तीसाठी बाबासाहेबांची देशातील ज्या ज्या प्रमुख व्यक्तींशी बोलणी सुरु होती, त्यात एक नाव होतं, राम मनोहर लोहिया. या लोहियांचे चेले मुलायम, लालू, नितीश वगैरे लोकसभा निवडणुकीत पार लयाला गेले.

समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्वांवर आधारित पक्ष बाबासाहेबांना अपेक्षित होता. लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल रक्तविरहीत मार्गांनी घडवून आणणारी शासनपद्धती म्हणजे लोकशाही ही बाबासाहेबांची लोकशाहीची कल्पना.

संविधानात्मक नीतिमत्तेच्या पालनावर बाबासाहेबांचा भर होता. बाबासाहेबांच्या स्वप्नातील कॉंग्रेसला पर्याय होईल असा पक्ष देशात उभा राहिलाच नाही.

आणीबाणीनंतर कॉंग्रेसचा सफाया झाला होता. इंदिरा गांधींनी ती सत्ता पुन्हा हस्तगत केली. त्यांच्या मृत्युनंतर राजीव गांधींना दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत मिळालं होतं. नंतरचा काळ मात्र आघाड्या सरकारांचा आला. आणि देशात प्रचंड अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली.

कॉंग्रेसने काहीच केलं नाही, असंही नाही. पण देशातील जनतेचा विश्वास संपादन करण्यात कॉंग्रेस असफल ठरत गेली. गेल्या दोन वर्षात त्यावर कळस चढला. लोकांना कॉंग्रेस नकोशी झाली. अशावेळी देशासमोर एकच पर्याय होता, भारतीय जनता पार्टी.

१९५१ पासून नाना क्लुप्त्या वापरून विविध रुपात वावरूनसुद्धा वारंवार अयशस्वी ठरलेली भाजपा काही काळ सत्तेत आली. पुन्हा गेली. पण प्रयत्नांचं सातत्य आणि येनकेनप्रकारच्या खेळ्या याची फलश्रुती आज भाजपाला स्वबळावर स्पष्ट बहुमत देण्यात झाली आहे.

कॉंग्रेसला पर्याय मिळाला, पण तो पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, आंबेडकरी विचारधारेला रुचणारा नाही. अर्थात, आजच्या नव आंबेडकरी विचारधारेतही बाबासाहेबांना अपेक्षित देशातील सर्व समाजघटकांना सामावून घेणारा व्यापक दृष्टीकोन नाही, हीच मोठी अडचण आहे.

संयम, समन्वयाचा अभाव, ध्येयाची अनिश्चिती आणि वैचारिक गोंधळ. या बाबी परिवर्तनाच्या लढाईतील अडथळे बनले आहेत. समाजकारण आणि राजकारण यांची गल्लत होते आहे. योग्य राजकीय पर्याय देण्याची जबाबदारी पार पाडली गेली नाही. त्यामुळेच देशापुढे जो पर्याय होता, तो कसाही असला तरी स्वीकारण्याची पाळी देशावर आली.

भाजपाच्या ओठात पोटात वेगळं असेलही,किंबहुना आहेच, पण कॉंग्रेसविरोधातील राजकारण करण्यात, देशातील सर्व समाजघटकांना आपली भूमिका गळी उतरवण्यात तो पक्ष यशस्वी ठरला आहे, हे सत्य नाकारून उपयोग नाही.

आपल्याला आपल्याला देशातील हा राजकीय बदल खटकत असेल, तर समर्थ राजकीय पर्याय देण्याचीही तयारी हवी. नुसता विरोधाला विरोध करून काहीही साध्य होणार नाही.

धम्म !!!

आमच्यात बारसं करत नाहीत, पण आम्ही नामकरण करतो.

आमच्यात लग्न नव्हे, तर मंगल परिणय करतात.

आमच्यात वास्तुशांती करीत नाहीत, गृहप्रवेश करतात.

आमच्यात बारावं करीत नाहीत, जलदानविधी करतात.

आम्ही आत्मा मानत नाही, पण फोटोसमोर प्रसाद ठेवतो.

आमच्यात श्राध्द घालत नाहीत, पुण्यानुमोदन करतात.

आमच्यात पुजेवेळी पंचामृत नसतं, पाच फळं असतात.

कलश नसतो, तांब्या असतो.

आंब्याची पानं नसतात, पिंपळाची पानं असतात.

धागा नसतो, सूत असतं.

मंगलाष्टकं नसतात, अष्टमंगलगाथा असते.

आम्ही सत्यनारायण घालत नाही, परित्राण पाठ करतो.

आम्ही कर्मकांडं करत नाही, पुजाविधी करतो.

आम्ही मूर्तीपुजा मानत नाही, पण बुध्दाची मूर्ती पुजतो.

आम्ही अंगरबत्त्या-मेणबत्त्या लावतो, हाथ जोडतो, मंत्रोपचार केल्याप्रमाणे प्रार्थना म्हणतो, हार घालतो, फुलं वाहतो, एका विशिष्ट ( आमच्या ) पध्दतीने प्रणाम करतो. जलप्राशन करतो.

आमचा धर्म नाही, धम्म आहे.

आम्हाला जगातल्या कुठल्याही धर्मावर बोलायचा अधिकार आहे, पण जी व्यक्ति आमच्या धर्माची नाही, तिला आमच्या धर्मावर बोलण्याचा अधिकार नाही.

आम्ही जे काही करतो, ते कसं वैज्ञानिक आहे, हे सांगणारे पुस्तकंच्या पुस्तकं, भाषणंच्या भाषणं भरुन आमच्याकडे स्पष्टीकरण आहे,

कारण

आमच्याकडे तसं जातप्रमाणपत्र असल्याने आम्ही विज्ञानवादी असल्याचं गृहितच धरुन चालतो.

मग आम्ही

वर्तनाने बौध्द असलो किंवा नसलो तरीही,

आम्ही स्वत:ला विज्ञानवादी मानतो !!!