जिकडे पाहावं तिकडे इमारतींची बांधकामं सुरु आहेत. झाडांची, जंगलांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होते आहे. डोंगर उघडबोडके होताहेत. शहरांच्या कॉंक्रीटीकरणात जमीनीत पाणी झिरपण्याची प्रक्रिया बंद झाली आहे. खाड्या बुजवल्या जाताहेत. धूळ वाढलीय. अस्वच्छता वाढलीय. प्रदुषण वाढलंय. आणि या सगळ्याला जबाबदार असलेले तेच तेच राजकीय पक्ष, नेते, तथाकथित लोकप्रतिनिधी आपण पुन्हा पुन्हा डोक्यावर घेतोय. पुन्हा पुन्हा निवडून देतोय. कालपरवापर्यंत नाक्यावर उभे राहून टपोरीगिरी करणारे, दारु, पैसा, दादागिरीच्या जोरावर निवडून येणारे लोक फक्त सिमेंटच्या रस्तेगल्ल्यांची, पेवरब्लॉकची कमिशनखाऊ कामे करु शकतात. त्यापलिकडे विचार करण्याची त्यांची कुवतही नसते. ग्रंथालये, अभ्यासिका, प्रदर्शन दालने, प्रेक्षागृहे, विज्ञानभवन, संगीत केंद्र, कलादालन, क्रीडांगण, संग्रहालयासारखी कामे कोणी सूचवत नाही. ही टपराट माणसे पर्यावरण विषयावर काम करतील काय, याचा मतदान करतानाच विचार केला पाहिजे. सभोवताल प्रदुषित आहे. आजारपणं वाढली आहेत. आपल्या मुलाबाळांच्या जिवितापेक्षा, भवितव्यापेक्षा आपली राजकीय बांधिलकी अधिक महत्त्वाची आहे का याचा शांतपणे बसून विचार केला पाहिजे. आपल्याकडे राजकीय पक्षांकडे झेंडा आहे, पण अझेंडा कोणाकडेही नाही. दिसला चौक की अपघातांची पर्वा न करता रस्त्यांच्या मधोमध झेंडा गाडणारे लोक सामाजिक विषयांवर बोलतात, तेव्हा हसावं की रडावं, हेच कळत नाही. सद्या देशात पक्ष दोनच. सत्तेत असलेले आणि सत्तेत नसलेले. बड्या लोकांच्या हितासाठी मतभेद विसरुन एकत्र येणाऱ्या कोडग्या लोकांच्या हातात देशाचं राजकारण आहे. इथे विरोधी पक्षच नाही. मग तुमची लोकशाही टिकणार कशी ? आधुनिक लोकशाहीचं उद्दिष्ट अनियंत्रित राजसत्तेवर नियंत्रण घालणे नसून लोककल्याण साधणे हे आहे आणि लोकशाही यशस्वी होण्यासाठी विरोधी पक्षाची आवश्यकता आहे, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत. यासाठी आता तुम्हालाआम्हालाच विरोधी पक्षाची भुमिका निभावावी लागेल. खरंच उकाड्याने हैराण असाल, तर गंभीरपणे विचार करा.
- राज असरोंडकर
कायद्याने वागा लोकचळवळ