Sunday, 13 October 2013

धर्मांतर

आज सगळीकडे हिंदू लोक दसऱ्याच्या धामधुमीत असताना, बौद्ध समाज सुद्धा धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यांमध्ये गुंग होता. बौद्ध समाज हा दिन दसऱ्या दिवशी का साजरा करतो यावर वाद प्रतिवाद आहेत. त्यावर दिवसभर कोणा ना कोणाशी चर्चा सुरूच होती. मी माझ्या शुभेच्छा उद्याच देणार यावर मी अडून होतो आणि त्यात मित्रांचा गोतावळा जमून संध्याकाळी कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात " ठष्ठ " पाहणे झाले. बुद्धाच्या विचाराशी नातं सांगणाऱ्या कोणाही व्यक्तीची वर्तणूक कशी असली पाहिजे, त्याचं एक चांगलं उदाहरण ह्या नाटकात पाहायला मिळालं.

स्त्रियांना समाजात मिळणारी दुय्यम वागणूक, त्यांची घुसमट अत्यंत परिणामकारकपणे "ठष्ठ "मधून आली आहे. संजय पवार यांचे थेट काळजाला हात घालणारे तर कधी मेंदूला झिणझिण्या आणणारे संवाद हि " ठष्ठ " ची ताकद आहे. संजय पवार यांचच दिग्दर्शन, कलाकारांचा सशक्त अभिनय, कथेचा प्रवास आपल्याला नाटकाचा प्रेक्षक म्हणून खिळवून तर ठेवतंच आणि एक माणूस म्हणून आपल्याला अस्वस्थ करतं. नव्या पिढीने हे नाटक आवर्जून पाहायलाच पाहिजे.

नाटकात साठे नावाच्या महिला वसतिगृहाच्या अधीक्षिका आहेत. नाटकात त्या कुठेच दिसत नाहीत. पण पात्रांच्या संवादातून त्या बौद्ध असल्याचं आपल्याला कळत. वसतिगृहातील ३०२ क्रमांकाची खोली शापित आहे, त्यामुळे तिथे थांबणाऱ्या मुलींची लग्ने मोडतात, असा समज करून घेतलेल्या व तो पसरवणाऱ्या गंडे दोरे यावर विश्वास ठेवणाऱ्या शिंदे नावाच्या पर्यवेक्षिका साठेंना पुणेरी ब्राह्मण समजत असतात. ३०२ क्रमांकाच्या खोलीबद्दल सगळं माहिती असतानाही साठे ती खोली नव्या मुलींना का देतात, हा प्रश्न शिंदेंना नेहमी पडत असतो. पण नंतर त्यांना कळतं, त्या जयभीमवाल्या आहेत म्हणून. "त्यांचा गौतम बुद्ध का नाही येत मुलींची मदत करायला..?" असं शिंदे एके ठिकाणी विचारतात सुद्धा.

त्या प्रश्नाचं उत्तर नाटकातलंच एक गुजराती युवतीचं पात्र ज्योती देते. ज्योती तिचं लग्न मोडल्यामुळे अस्वस्थ होते, तेंव्हा तिला पुण्याला घरी परत जाताना साठे बाई "अत्त दीप भव" नावाचं पुस्तक देतात. असाही प्रसंग आहे. तो सूचक आहे. साठे बाई सुधारणावादी विचारांच्या असल्याचं आपल्याला त्यातून ध्वनित होतं, त्या विवेकवाद जोपासणाऱ्या असल्याचं आपल्याला कळतं. किंबहुना जयभीमवाल्यांकडून लेखकाला तीच अपेक्षा असल्याचं दिसून येतं.

हिंदू धर्मातील मागास जातीत खितपत पडलेल्या, अत्यंत उपेक्षेचं, अपमानास्पद जीवन जगणाऱ्या समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा मार्ग पुन्हा एकदा नव्याने दाखवला. १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी बौद्ध धम्माचं चक्र पुन्हा प्रवर्तित झालं. लाखो लोकांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. धर्मांतरासाठी रक्तरंजित घटनांचा इतिहास असताना अत्यंत शांततेत लाखो लोक "बुद्धं सरणं गच्छामि " म्हणत धर्मांतर करतात, हि जगाच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण सामाजिक घटना आहे. केवळ एक धार्मिक घटना म्हणून तिच्याकडे पाहता येणार नाही. कोलंबोचे एच डब्लू अमरासुरीय बाबासाहेबांना पाठवलेल्या शुभ संदेशात म्हणतात, कि १४ ऑक्टोबर हा दिवस जगभरातील बौद्धजणांना सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा लागेल.

धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासंदर्भात २९ सप्टेबर, १९५६ रोजीच्या प्रबुद्ध भारत मध्ये छापून आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि हिंदू धर्माच्या सीमांमध्ये बंदिस्त अस्पृश्य समाज त्यांना शतकानुशतके गुलाम ठेवणारी धार्मिक तटबंदी उल्लंघून नव स्वातंत्र्याचे उदक पिण्यासाठी तयार होणार आहेत. हेच ते सीमोल्लंघन. ते केल्यावर परत यावयाचे नाही, या भीम निश्चयाने अनेक अस्पृश्य दलितांचे पाऊल पुढे पडणार आहे. या निवेदनातील परत यावयाचे नाही, हे पुरेसे सूचक आहे. दसऱ्याच्या दिवशी तारीख १४ ऑक्टोबर १९५६ रोजी मी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे, असे निवेदन बाबासाहेबांनी प्रसिद्धीसाठी दिले होते. बाबासाहेबांना फक्त दसऱ्याच्या दिवशी इतकाही उल्लेख करता आला असता. पण त्यांनी तारीख आवर्जून नमूद केलीय. दसरा हा हिंदू धर्मातील एक मोठा सण. तो दिवस हिंदू धर्मातून बाहेर पडण्यासाठी बाबासाहेबांनी का निवडला असेल, ते वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. बाबासाहेबांनी अशोक विजयादशमी किंवा दसरा तो दिवस डोळ्यासमोर ठेवून  १४ ऑक्टोबर हि तारीख निश्चित केल्याचं सकृतदर्शनी दिसत असलं तरी  त्याचं ओढूनताणून समर्थन करीत बौद्ध बांधवांनी धर्मांतरानंतर दसऱ्याचाच मुहूर्त शिरोधार्य मानत आपली वाटचाल पुढे सुरु ठेवणं, सीमोल्लंघन केल्यावरही पुन्हा मागे मागे वळून पाहणं बुद्धीला पटत नाही. ते विवेकवादालाही धरून नाही, कारण जागतिक ऐतिहासिक घटनांच्या तारखा दरवर्षी बदलत नसतात.....

धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....

Saturday, 21 September 2013

दुर्घटना

दुर्घटना


पहिली इमारत कोसळली...अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला...दुसरी इमारत कोसळली...लोकांच्या निवाऱ्याचा प्रश्न पुढे केला गेला...इमारती कोसळताहेत.....पण साप साप म्हणत भुई थोपटण्याचा प्रकार सुरु आहे...आपणच वाढवलेलं पाप असं उरावर बसेल, हे कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं...पण अति तेथे माती, हा निसर्गाचा नियम आहे...जी चूक मानवाने स्वतः निस्तरायला हवी होती, ती निसर्गाने स्वतःच्या हातात घेतली ...आता आणखी एक इमारत कोसळलीय...पुन्हा चर्चा...पुन्हा आश्वासने...पुन्हा आजचा सवाल...रोखठोक...तेच प्रश्न..तेच चेहरे..तीच उत्तरे...वारंवार घडणाऱ्या घटनेने अनधिकृत बांधकामांच्या मुद्यावरून राजकीय भूकंप होऊ शकतो, हे लक्षात घेऊन, आता संबंधित क्षेत्र भूकंप प्रवण आहे का, याच्या तपासाची मागणी करून पुन्हा मूळ समस्येला बगल देण्याचा प्रयत्न सुरु आहे. राजकारण करण्यासाठी गेंड्याची कातडी असावी लागते म्हणतात, ते उगाच नाही...!!!

जखमींना एक लाख,
मृतांना दोन !!
हि मानवी जीवांची किंमत
कि तात्पुरता दिलासा देणारा दृष्टीकोन ?
सरकारचे जातात काही लाख,
पण लाखमोलाचे संसार होतात बेचिराख...

प्रत्येक आपत्तीत
सरकार देते उपाययोजनांची हमी,
प्रत्येक वेळी सरकारची
साधनसामुग्री पडते कमी...

आपलं कोणी जाईपर्यंत,
गेल्या जीवांची किंमत
आपल्यालाही कळत नसते,
आपणही असतो समजून उमजून,
कळूनही वळत नसते,

फक्त दोनचार दिवस
संकटांचे विषय गाजतात,
उध्वस्त जीवांच्या आक्रोशाने
बातम्यांचे स्टुडीओ सजतात,
घटना घडत राहतात,
चर्चा झडत राहतात,
लोकहि जातात विसरून
काय काय घडून गेलंय,
सरकारच्याही आता
सारे अंगवळणी पडून गेलंय...

सरकारचे जातात काही लाख,
पण लाखमोलाचे संसार होतात बेचिराख...

सामाजिक कार्यकर्त्यांची सुरक्षितता

सामाजिक कार्यकर्त्यांची सुरक्षितता आणि सरकारची उदासीनता...


दाभोळकरांचा खून करणारे मारेकरी सीसीटीवी फुटेज मध्ये अस्पष्ट दिसतात. त्यामुळे त्यांना महिना झाला तरी पकडता आलेले नाही. पण उल्हासनगरात शिवनेरी हॉस्पिटल वर हल्ला करून तेथील डॉक्टरांना मारहाण करणारे आरोपी सीसीटीवीत स्पष्ट दिसत असूनही, एक आठवडा झाला तरी पोलिसांना पकडता आलेले नाहीत.

पोलिसांनीच त्यांना पकडलेले नाही. का तर ते माजी आमदार पप्पू कलानी याचे कार्यकर्ते आहेत. एका बाजूला डॉक्टरांचा दबाव दुसऱ्या बाजूला कालानीचा. मग मार्ग कलानी यानेच पोलिसांना काढून दिला. सीसीटीवीत दिसणारे पण ज्यांनी हल्ल्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला नव्हता, असे दोन आरोपी पोलिसांसमोर हजर केले. त्यामुळे न्यायालयातून त्यांना पटकन जामीन मिळाला. त्या आधारे आता इतर प्रत्यक्ष मारहाण करणाऱ्या आरोपींना हजर करून त्यांना सहज जामीन घेता येणार आहे.

वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्था, व्यक्तींना हिंसक कृत्यापासून संरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने केला आहे. त्यात तो गुन्हा अजामीनपात्र ठरवण्यात आला आहे. पण कायद्याचे संरक्षक आणि राजकीय पाठबळ असलेले गुन्हेगार यांची अभद्र युती झाली कि कायदे कसे कुचकामी ठरतात, ते उल्हासनगरातील शिवनेरी प्रकरणात दिसून येते.

कलानीच्या दहशतीमुळे डॉक्टर उघडपणे मैदानात नाहीत. त्यामुळे हा सगळा प्रकार दाबला जात आहे. पण काळ सोकावतो आहे. आज हे गुन्हेगार तुलनेने किरकोळ असले, तरी भविष्यात त्यांची हिंमत वाढून ते अधिक मोठ्या गुन्ह्यात दिसतील. राजकारणात त्यांचे स्वतःचे आयुष्य, कुटुंब उद्ध्वस्त होईलच, पण समाजही असुरक्षित होतो, तो वेगळाच. कदाचित यातलाच एखादा आरोपी उद्या बलात्काराच्या गुन्ह्यात दिसू शकेल. आपले कोणी काही वाकडे करू शकले नाही, हि मग्रुरी निश्चितच गुन्हेगारीची त्यांची हिंमत वाढवेल.

सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन विशेष संरक्षण पुरवण्याचे आदेश ९ फेब्रुवारी, २०१० रोजी राज्याच्या गृहविभागाने पोलिसांना जारी केले आहेत. कारण तशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र सरकारने मा. उच्च न्यायालयात केले होते. पण प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे...? सामाजिक कार्यकर्ते जीव मुठीत घेऊन जगत आहेत. वाचा : https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20100308184009001.pdf

सरकार कायदे बनवते...आदेश परिपत्रके जारी करते....पण तेवढ्यापुरते...त्या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे, याबाबत सरकार गंभीर नसतं...दाभोलकरांचे मारेकरी सुपारी किलर होते, असा संशय गृहविभागाने व्यक्त केलाय. असे सुपारी किलर राजकीय पाठबळावर गल्लोगल्लीत उपलब्ध आहेत. नवनवे तयार होताहेत. विरोध करणारा माणूस संपवून टाकणं हितसंबंधीतांसाठी सोपे काम आहे. पण त्यांना शोधणे भविष्यात अधिकाधिक कठीण जाणार आहे. कारण गुन्हेगार तुमच्या आमच्या भोवतीच वावरत आहेत. ते आपल्यात बेमालूमपणे मिसळून गेले आहेत. राजकीय प्रतिष्ठेचा बुरखा पांघरून....!!!