Sunday, 6 April 2014

सोनियांचा सुसंस्कृतपणा

१९६५ च्या सुमारास सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांची भेट झाली होती. भेटीचे रुपांतर प्रेमात आणि पुढे नात्यात झालं. पण ते दोघेही राजकारणापासून दूरच होते. राजीव गांधींना पायलट कामात रस होता. आणि सोनिया एक गृहिणी होऊन कुटुंबात वावरत होती. मुले राहुल आणि प्रियांका....छोटे कुटुंब, सुखी कुटुंब...संजय गांधींच्या अकाली मृत्युनंतरही राजीव आणि सोनिया यांनी राजकारणात रस दाखवला नव्हता. पण १९८४ ला इंदिरांजींची हत्या झाली आणि परिस्थितीने राजीव गांधींना राजकारणात खेचून आणलं. स्वाभाविकपणे सोनिया गांधी राजकारणात वावरू लागल्या. राजीव गांधींनी देशाच्या आधुनिकतेवर लक्ष केंद्रित केलं.

आज ज्या माध्यमांचा वापर करून नवयुवक नेहरू गांधी घराण्याची खिल्ली उडवतोय, ती माध्यमे राजीव गांधींच्या नवविचारांची देण आहे , हे विसरून चालणार नाही. सरकारी योजनांतील भ्रष्टाचारावर थेट भाष्य करण्याचं धाडस राजीव गांधींनी दाखवलं. त्यांच्या कार्यकाळात भारत प्रगतीची घौडदौड करत असतानाच तामिळी वाघांनी त्यांची हत्या घडवून आणली. अत्यंत क्रूरपणे राजीव गांधीचा खून करण्यात आला. पण सोनिया किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी या देशाविरोधात किंवा देशवासीयांविरोधात ब्र काढला नाही. कॉंग्रेसने त्यावेळी सोनियांना पंतप्रधान होण्याबद्दल विचारलं होतं. पण त्यांनी नम्रपणे नकार दिला.

९७ च्या दरम्यान त्या कॉंग्रेस जणांच्या आग्रहाखातर राजकारणात आल्या. अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारात त्यांनी आक्रमक परिणामकारक विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली आणि  देशाची सत्ता पुन्हा कॉंग्रेसकडे खेचून आणली. कॉंग्रेस पक्षाच्या इतिहासात सर्वाधिक काळ अध्यक्षपदी राहण्याचा मान त्यांच्याकडे आहे. फोर्ब मासिकाच्या जगातील प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीच्या यादीत सोनिया गांधींचा समावेश आहे. भारतात त्यांची, त्यांच्या राजकारणाची, त्यांच्या भाषेची नेहमीच खिल्ली उडवली गेली. गुंगी गुडिया म्हणून त्यांना हिणवलं गेलं. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत त्यांची उघडीनागडी आक्षेपार्ह बनावट छायाचित्रे बनवून पद्धतशीरपणे देशभर पसरवण्यात आली. त्यांच्यावर घाणेरड्या पातळीवर जाऊन विनोद तयार करण्यात आले. देशाच्या राजकारणात इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण कधीच झालेलं नव्हतं. त्यामागच्या सडक्या बुद्धीची प्रेरणा कुठून होती, हे सर्वश्रुत आहे. पण देशातील सर्वोच्च प्रभावशाली व्यक्ती असतानाही त्यांनी असे करणाऱ्यांचा पिच्छा पुरविण्यासाठी सरकारी ताकद वापरली नाही की कोणाशी सूडबुद्धीने वागल्या नाहीत.

इतक्या वर्षात सोनिया गांधींनी कोणाही राजकीय नेत्याविरोधात वैयक्तिक टीका केलेली नाही, की आक्षेपार्ह शब्दांचा, भाषेचा वापर केला नाही. देशाचा माजी पंतप्रधान असलेल्या व्यक्तीच्या मारेकऱ्यांचा याचं देशात उघड पुरस्कार झाला. पण सोनिया गांधी त्याविरोधातही बोलल्या नाहीत. इथल्या मातीशी एकरूप होऊनही, राहूनही त्यांच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा आली. एक एकाकी लढणारी विधवा इथल्या तथाकथित संस्कृतीरक्षकांच्या चेष्टेचा विषय बनली. वास्तविक तिचं स्त्रीत्व आणि त्याहीपेक्षा तिचं वैधव्यच या कुजकट मानसिकतेच्या तथाकथित संस्कृतीरक्षकांच्या डोळ्यात खुपलं असेल, हे आपण लक्षातच घेत नाही.

धर्मांधतेला धर्मांधतेने उत्तर देऊ पाहणारे, निष्पाप बालकांना जिवंत जाळणारे, स्त्रियांच्या पेहरावांचे नियम बनवणारे, त्यांच्या घराबाहेर जाण्याच्या आणि घरात परतण्याच्या वेळा ठरवणारे, स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार, बलात्काराला तिलाच दोषी ठरवणारे, पंचायंतीच्या माध्यमातून स्त्रियांना विटंबित करण्याची सजा सुनावणारे, आंतरजातीय विवाह केला, म्हणून पोटच्या पोरींना क्रूरतेने ठार मारणारे हे तथाकथित संस्कृतीरक्षक एका विधवेला सर्वोच्च सत्तास्थानी स्वीकारू शकतच नव्हते. पोटदुखी तीच आहे. भ्रष्टाचार हा एक बहाणा आहे. पक्षीय घटनेत समाजवाद, गांधीवाद, समतावाद आणि प्रत्यक्षात वावरताना धर्मांधतेला राष्ट्रीयत्वाचा मुलामा चढवून माणसामाणसांना जातीधर्माच्या नावावर भिडवून एनकेनप्रकारे सत्तेत येण्याचे मनसुबे असलेले लोक परिवर्तनाच्या बाता मारतात, तेंव्हा हसू तर येतंच, पण त्यापेक्षा जास्त चिंता वाटते. भारताचा येणारा भविष्यकाळ काय असेल. येणाऱ्या काळात स्त्रियांची, मागासांची, अल्पसंख्याकांची स्थिती काय असेल..याची कल्पना करून मन धास्तावतं.

सोनिया गांधींची सत्ता गेली, त्याचं इथे कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. राजकारणात असे चढउतार येत असतात. आत्मचिंतनासाठी ते आवश्यक सुद्धा असतात. पण जाणाऱ्यांच्या जागी येतंय कोण, ते जास्त महत्वाचं आहे. तिथे येण्यासाठी आणि येईपर्यंत राजनीतिक संकेत, नितीमत्ता ज्याप्रमाणे पायदळी तुडवली गेली, सुसंस्कृतपणाच्या चिंधड्या केल्या गेल्या, खोटारडेपणाचा कळस केला गेला, तेच लोक संस्कृतीरक्षक म्हणून वावरताहेत. उज्ज्वल भारताचे स्वप्न दाखवताहेत. चिंता त्याची वाटत्तेय. विदेशी म्हणून जिला सतत हिणवले गेले, तिने जितका सुसंस्कृतपणा जपला, त्याच्या टक्काभरसुद्धा सुसंस्कृतपणा नसलेली माणसे बदलाची भाषा, देश घडवण्याची भाषा करताहेत, चिंता त्याची वाटतेय. 

No comments:

Post a Comment