Tuesday, 10 February 2015

आप चं यश निर्विवाद !!

भाजपाने एका बाजुला कॉंग्रेसमुक्त भारताची घोषणा करत असताना, दुसरीकडे कॉंग्रेसी राजकीय संस्कृतीचा अंगिकार केला. त्याचा परिणाम व्हायचाच होता. भाजपाला कॉंग्रेस चालत नाही, राष्ट्रवादी चालत नाही, जदयु चालत नाही, पण त्या पक्षातले भ्रष्ट, गुंड चालतात. या देशातले लोक यातली दिशाभुल न समजण्याइतके अजाण आहेत, असं भाजपाला वाटत होतं. सत्ता मिळताच भाजपाच्या मित्रसंघटनांना अक्षरश: ऊत आला. भाजपा देशाचे सत्ताधारी नाही, तर मालक बनली आहे, अशा अविर्भावात दीडदमडीचे साधुसाध्वी बोलू लागले होते. विकासाची झाकपाक दाखवत धार्मिक अजेंडा राबवण्याचा हेतू भाजपाच्या उतावळेपणामुळे लपून राहिला नाही  त्यामुळे मतदारांनी भाजपाला पर्याय शोधणं क्रमप्राप्त होतं. कॉंग्रेस हतबल अवस्थेत होती. तेव्हा पर्याय "आप"चाच होता. पण तितकंच "आप"च्या यशाचं कारण नाही. देशाला केजरीवाल माहित व्हायच्या आधीपासून ते दिल्लीकरांमध्ये लोकप्रिय आहेत. झटपट कमिशन देणाऱ्या विकासाच्या बडेजावात गल्लीबोळातील दैनंदिन प्रश्नांवर काम करणारे राजकीय पक्ष आता राहिलेले नाहीत. "आप" ने दिल्लीत ती उणीव भरून काढली. दिल्लीतल्या भाजपा आणि कॉंग्रेस या दोन्ही बड्या पक्षांचा हल्ला "आप" वर होता. तरीही इतकं भरघोस यश "आप" ला मिळालं. ते निर्विवाद असंच आहे.

No comments:

Post a Comment