Sunday, 10 April 2016

तृप्ती देसाई म्हणतात, माझी आई आज असायला हवी होती !!!


शनिशिंगणापूरच्या मंदिरात चौथऱ्यावर स्त्रियांना प्रवेश देण्याचा निर्णय मंदिर विश्वस्तांनी घेतला, हा ऐतिहासिक क्षण अनुभवायला माझी आई आज असायला हवी होती, तिने नक्कीच माझ्या पाठीवर शाबासकी दिली असती, असे भावपूर्ण उदगार भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी काढले.

कायद्याने वागा लोकचळवळीचं अंग असलेल्या स्त्रीजाणीवांना वाहिलेल्या क्रांतीज्योती या वॉटस्एप समुहातील सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना तृप्तींनी सांगितलं की माझ्या घरात अध्यात्मिक वातावरण आहे, पण माझ्या मंदिर प्रवेशाच्या भुमिकेला किंवा आंदोलनांना कुटुंबातून कोणताही विरोध झाला नाही. गेल्या वर्षीच माझ्या आईचं निधन झालं, पण ती असती तर तिने मला पाठबळच दिलं असतं.

मुद्दा फक्त शनिशिंगणापूरचा नसून सर्वच मंदिरात स्त्रियांना प्रवेश मिळाला पाहिजे, यासाठी आंदोलनाची भुमिका घेतलेली असताना माझ्या मनात कसलेही भय नसल्याचं देसाई यांनी सांगितलं. आपल्याविरोधात समाजमाध्यमात सुरु असलेल्या अश्लील शेरेबाजीला उत्तर देण्याची गरज भासत नसल्याचे सांगून रीतसर कायदेशीर तक्रार मात्र केली असल्याची माहिती तृप्ती देसाई यांनी दिली.

धार्मिक विषयांत विरोधाची भुमिका घेण्य़ाच्या घटनांना दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्यांची पार्श्वभुमी आहे, सरकार प्रतिकूल विचारांचे आहे, या टिप्पणीवर तृप्ती म्हणाल्या की मी परिणामांची संपूर्ण मानसिक तयारी करुनच लढ्यात उतरले आहे.

शनिदेव धर्मद्रोह्यांना शासन केल्याशिवाय राहणार नाही, या हिंदू जनजागृती समितीच्या गर्भित इशाऱ्याकडे लक्ष वेधले असता, तृप्ती देसाई फक्त हसल्या.

वृत्तांकन : राज असरोंडकर

No comments:

Post a Comment