Friday, 7 August 2015

श्रेया, तू एकटी नाहीस !!!!

डोंबिवलीच्या श्रेया निमोणकरचं पुन्हा हॉस्पिटलला एडमिट होणं आम्हा सगळ्यांना धक्कादायक होतं आणि मनात भीतीचं काहूर निर्माण करणारं. श्रेया आहेच इतकी गोड कि तिने फक्त आणि फक्त हसत राहावं, असं अगदी तिच्या शत्रूलाही वाटावं. अत्यंत निर्मळ मनाची. खेळकर, खोडकर, मनमिळाऊ...कळल्याबरोबर धावतपळत सायन हॉस्पिटलला गेलो. ती नेहमीप्रमाणेच मनमोकळी हसली, पण तिच्या चेहऱ्यावरचा तणाव लपला नाही. तो लपणं शक्यही नव्हतं. इतकं सहज नव्हतं ते. श्रेयाचा आधीचा अनुभव भयावह होता. मासिक पाळी नियमित येत नाही, म्हणून डोंबिवलीतील डॉ. सीमा शानबाग ह्या स्त्रीरोगतज्ञाकडे सुरु केलेले उपचार, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे , श्रेया निमोणकर यांना  मरणाच्या दारात घेऊन गेले. इच्छाशक्तीच्या जोरावर ती मृत्यूशी झगडली, पण आयुष्य खडतर झालं. धक्कादायक गोष्ट हि की डॉक्टर अद्यापही निष्काळजीपणाची जबाबदारी मात्र घ्यायला तयार नाहीत.

श्रेया आणि तिचा नवरा मिलिंद यांनी जंग जंग पछाडलं. अथक पाठपुरावा केला. डॉक्टरांनी केलेली हेळसांड कागदावर अवतरली, पण निष्काळजीपणासाठी डॉक्टरांच्या मुसक्या आवळेल, असा कायदा आपल्या देशात नाही. प्रकरण ४ वर्षे झाली, ग्राहक न्यायालयात सुरु आहे आणि मेडिकल कौन्सिल मध्ये सुद्धा. स्थानिक पोलीस ठाण्यापासून ते मंत्रालयापर्यंत शेकडो चकरा झाल्या. कार्यवाहीचा प्रत्येक क्षण श्रेया-मिलिंद ने पुढे सरकवला, तेंव्हाच पुढे सरकला. ४ वर्षात तो कधीच स्वत:हून जागचा हालला नाही. प्रचंड मनस्ताप, आर्थिक भुर्दंड दोघांनी सोसला. दोघांची नोकरी गेली. घरात दोन शिकणारी मुलं. एका बाजूला त्यांची जबाबदारी आणि दुसऱ्या बाजूला न्यायासाठी लढाई.

डॉक्टरांच्या चुकीमुळे श्रेया आज कृत्रिम मूत्रविसर्जन व्यवस्थेवर अवलंबून आहे. दर दोन अडीच तासाला तिला लघवीचा त्रास आहे. आयुष्यभर तिच्या सोबत.

डॉ. सीमा शानबाग यांना त्यांनी सारा प्रकार सांगितला तेंव्हा, त्यांनी सुरुवातीला सहानुभूती दाखवली, पण नंतर "तुम्हाला जे करायचं ते करा, माझं कोणी काही वाकडं करू शकणार नाही " असं त्यांनी ऐकवलं. बेपर्वाई तर होतीच, आता माणुसकीही उरली नव्हती. डॉक्टर हा सुद्धा माणूस आहे. त्याच्याकडूनही चूक होऊ शकते, हे मान्य. पण झालेली चूक,  कबूल करण्याचा मनाचा मोठेपणा नसल्याने,  तिची जबाबदारी स्वीकारण्यात झालेली डॉक्टरांची गफलत श्रेयाच्या जीवावर उठली. प्रश्न केवळ डॉक्टरांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेचा नव्हता, तर एका हसत्याखेळत्या माणसाचा होता, हेच नेमकं डॉक्टर विसरले.

श्रेयाची लढाई सुरु आहे. न्याय प्रक्रिया कासवाच्या गतीने हलतेय आणि डॉक्टरांचा व्यवसाय मात्र , जणू काही काहीच घडले नाही, या अविर्भावात जोमात सुरु आहे. कारण समाजही ढोंगी आहे. स्वतःवर आल्याशिवाय तो जागा होत नाही. आणि सरकारला कारवाईची पावलं उचलायला कित्येक बळी लागतात.

श्रेया आता पुन्हा हॉस्पिटलात एडमिट आहे.  तिच्या पोटात प्रचंड दुखू लागलं होतं. सुरवातीला एपेन्डीक्स ची शक्यता वाटत होती. पण आता सोनोग्राफी, स्कैनिंग नंतर निदान झालंय की निष्काळजीपणाने  झालेल्या शस्त्रक्रियेचेच दुष्परिणाम म्हणून गाठ तयार झालीय. तिच्याच वेदना होताहेत. सायन हॉस्पिटलचे डॉक्टर अत्यंत नाजुकतेने हे प्रकरण हाताळताहेत. पुन्हा शस्त्रक्रिया टळावी, म्हणून डॉक्टरांचे अथक प्रयत्न सुरु आहेत. पुढे काय होणार, या भीतीने दोघे नवरा बायको भेदरले आहेत. मुलं चिंतेने ग्रासली आहेत. निर्धास्त आहेत ते फक्त संबंधित डॉक्टर्स आणि सरकारी यंत्रणा !!!

कायद्याने वागा लोकचळवळ यावर जनतेचा कौल मागते आहे. डॉक्टरांनी सदर प्रकरणात जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांच्यावर दबाव निर्माण करावा लागेल.  राज्य सरकारकडे विशेष समिती नेमून वेगवान चौकशीची मागणी करावी लागेल. ही चौकशी जास्तीत जास्त महिनाभरात पूर्ण व्हायला हवी, म्हणून मुख्यमंत्र्यांना सांगावं लागेल. रुग्णांच्या तक्रारींबाबत हेळसांड होणार नाही, अशी यंत्रणा उभी करण्यासाठी लोकआंदोलन उभारावे लागेल. निष्काळजीपणा करणारे, तो लपवणारे, बेपर्वाईने वागणारे, नुकसानभरपाईची जबाबदारी झटकणारे डॉक्टर्स कायद्याच्या कक्षेत आलेच पाहिजेत, यासाठी मोठा लढा उभारावा लागेल. जसा डॉक्टरांच्या संरक्षणाचा विशेष कायदा आहे, तसा तो रुग्णांच्या संरक्षणाचासुद्धा असला पाहिजे, हे सरकारला ठासून सांगावं लागेल. श्रेयाची लढाई त्यासाठीच आहे. श्रेयाची लढाई समस्त महिलांची लढाई आहे. ती समस्त रुग्णांची लढाई आहे. ती एकटी नाही, हा विश्वास तिला महाराष्ट्र देणार आहे कि नाही, हा आमचा सवाल आहे.

- राज असरोंडकर
कायद्याने वागा लोकचळवळ

अधिक माहितीसाठी संपर्क :

श्रेया निमोणकर
+917208336742

मिलिंद निमोणकर
+91 99309 33325

No comments:

Post a Comment