Tuesday, 5 December 2017

खर्डा

दलित युवकांच्या हत्येचं प्रकरण आहे ना, मग प्रतिक्रिया कोण देणार माध्यमांना रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे.....इत्यादी....मग राज ठाकरे, उध्दव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा, एकनाथ खडसे, माणिकराव ठाकरे यांची काय वाचा बसलीय...? अरे जातीयवादातून नका बघू, या घटनेकडे तुमच्या सोयीनुसार, पण एक १७ वर्षाचा गरीब युवक क्रूरपणे हाल हाल करून ठार मारला जातो, पक्षातर्फे साधा निषेध तरी करा...

खर्डा गाव नगर जिल्ह्यात असलं तरी बीड आणि उस्मानाबादच्या सीमेवर आहे. बीड मध्ये गोपीनाथ मुंडे आहेत. स्थानिक आमदार राम शिंदे भाजपाचे, खासदार दिलीप गांधी भाजपाचे....पण कोणीही फिरकलेले नाहीत. पालकमंत्री मधुकर पिचड १ महाराष्ट्र दिनाचं झेंडा वंदन करून गेले. पण त्यांना थोडं पुढे जाऊन आगे कुटुंबाची विचारपूस करावीशी वाटली नाही...मग पाच दिवस उलटून पोलीस पाटीलसुद्धा फिरकला नसेल, तर नवल काय..? कारण सरळ आहे...ग्राम पंचायत, पंचायत समिती राष्ट्रवादीकडे आहे. आरोपी कंपनी तिथे सत्तेवर आहे. राजकारण चालतं बहुमतावर...हल्लेखोर बहुमतात आहेत....आणि पिडीत जातीची पाच पन्नास घरं...अशावेळी पीडितांना सहानुभूती दाखवून राजकीय अवसानघातकीपणा कोण करणार..? एरव्ही एकमेकांची उणीधुणी काढणारी राजकीय मंडळी जातीयवादाच्या प्रकरणात पडद्यामागे कशी गळ्यात गळे घालून असतात, ते अशा प्रसंगात दिसतं...

नगर जिल्ह्यातल्याच सोनई हत्याकांडातसुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोक गुंतलेले होते. पक्षाने त्यांना काढून टाकल्याचं अजून ऐकिवात नाही. पालकमंत्री असूनही बबनराव पाचपुते घटनास्थळी फिरकले नव्हते. शरद पवारांनी पाचपुते किंवा पिचडांना याबाबत खडसावलं असेल, असं वाटत नाही.

नितीन आगेच्या वडिलांना मी विचारलं...त्याचे कोणी मित्र आहेत का जवळचे....तर म्हणाले, तेच होते ज्यांनी त्याला ठार मारलं...याचा अर्थ स्पष्ट आहे, प्रेम, मैत्री, माणुसकी यांच्यापेक्षा जातिवाद नव्या पिढीच्याही मनात किती खोल रुजला आहे. मुलाला मारहाण झाली ऐकल्यावर सैरभैर शोधत फिरणाऱ्या नितीनच्या आईवडिलांना ही मुले सांगतात....आम्ही हाणलाय त्याला..हाणून पाठवलाय तिकडं कान्होबा मंदिराकडं......किती हा माज...पुरोगामित्व फक्त नेत्यांच्या बोलघेवडेपणात टिकून आहे...भाषणात फुले आंबेडकरांचा विचार आणि प्रत्यक्षात मनात जातीवादी विखार...नाहीतर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतून एका शिकू पाहणाऱ्या हिंदू महार युवकाला फरफटत नेऊन निर्दयतेने ठार मारलं गेलं नसतं...दोनच दिवसापूर्वी त्याने आईला सांगितलं होतं, की मुलगी म्हणते, मला तूच नवरा करायचाय...पण ती माऊली म्हणाली, लेकरा आपण गरीब लोक..तू ह्या लफड्यात पडू नकोस....कदाचित हेच मुलीला सांगताना पाहिलं गेलं असावं नितीनला आणि तेच त्याच्या मृत्यूला कारण ठरलं....

काल वाल्मिकी नेते मोहन कंडारे, ओबीसी नेते उपेंद्र बोऱ्हाडे आणि मी खर्डा गावी जाऊन आलो. सांगितलं नितीनच्या वडिलांना आणि तिथे जमलेल्या युवकांना....नेते येतील आणि जातील, चार दिवस लोक सहानुभूती दाखवतील..पण आपली लढाई आपल्यालाच लढायची हे लक्षात घेऊन पावलं टाका...एफ आय आर नीट वाचून घ्या..शिकलेल्या पोरांकडून...काय राहिलंय का बघा...काय चुकीचं टाकलंय ते बघा..आणि पोलिसांना सांगून दुरुस्ती करून घ्या...वास्तविक एफ आय आर पुरेसा बोलका आहे. आता जबाबदारी पोलिसांची आहे...भक्कम पुरावे असलेलं आरोपपत्र दाखल झालं तर उपयोग...नुसतं जलदगती न्यायालय मंजूर होऊन उपयोग नाही...

नितीनचे वडील म्हणत होते, त्यांना इतकाच राग होता तर स्वतःच्या मुलीला का नाही मारलं असं हाल हाल करून...? म्हणाले, साहेब आम्हाला रस्ता दाखवा..आम्ही लढू..पण माझ्या मुलाचे मारेकरी फासावर गेले पाहिजेत...नितीनच्या वडिलांची आर्जव मनावर घेतलीय, इतकंच आता जाहिर करतो....

- राज असरोंडकर, मोहन कंडारे, उपेंद्र बोऱ्हाडे...

आम्ही अजूनही नाॅन-हिंदूच!!!

माझे आजोबा फौजदार होते. तुकाराम फौजदार म्हणून त्यांची अख्ख्या मालवणात ख्याती होती. जोपर्यंत आजोबांनी बाबासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन धर्मांतर केलं नव्हतं, तोपर्यंत त्यांची हजेरी तालुक्याला तुकनाक म्हार अशी लागायची. एक दिवस मात्र आजोबांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले, आम्ही आता म्हार राहिलेलो नाही. आम्ही बौद्ध आहोत. अधिकारी म्हणाले, मग आडनावाचे काय...? आजोबा म्हणाले, आम्ही असरोंडी गावचे. आम्हाला असरोंडकर म्हणा. आणि आम्ही असरोंडकर झालो. माझ्या वाडवडिलांचा जन्म हिंदू धर्मात अस्पृश्य समजल्या गेलेल्या म्हार जातीत झाला. पण माझा जन्म बौद्ध म्हणून झाला. बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे ते होऊ शकले. जगातला महान असा धम्म मला अनुभवायला मिळाला. म्हणजे नेमकं काय झालं, त्याचा विचार मी अलीकडे थोडीफार अक्कल येऊ लागल्यावर करू लागलो. तेंव्हा मला जाणवले, बाबासाहेबांनी धर्मांतरावेळी काही प्रतिज्ञा दिल्या होत्या. त्यातला काही प्रतिज्ञा हिंदू धर्माच्या त्यागासंदर्भात होत्या. तर काही बौद्ध धर्माच्या पालनासंदर्भात होत्या. एक धर्म सोडून दुसरा स्वीकारण्याची समांतर प्रक्रिया होती, त्या प्रतिज्ञा म्हणजे. पण सोडून देणं तसं सोपं असतं, स्वीकारणं कठीण...त्यातही बौद्ध धम्माचं पालन...कठीणच...मग हिंदू धर्माच्या त्यागावर अधिक जोर दिला गेला आणि धम्माच्या पालनात तडजोड केली गेली. त्यांची वास्तुशांती , आपला गृहप्रवेश, त्यांचा बारसा, आपले नामकरण, त्यांचा विवाह, आपला परिणय, त्यांच्यात श्रीमान , आपल्यात आयुष्यमान, त्याचं पंचामृत, आपली पाच फळे, त्यांचा आंबा, आपला  पिंपळ, त्यांचा कलश, आपला तांब्या...त्यांची मंगलाष्टके आणि आपली अष्टमंगलगाथा, त्याचं तेरावं, आपला जलदान विधी, त्याचं श्राद्ध नि आपलं पुण्यानुमोदन...त्यांच्यात आणि आमच्यात फक्त एक पुसटशी रेषा...पौरोहित्य तिथेही आणि इथेही.. म्हणून आजही पंचशील घेऊन हळदीला सुरुवात करतात...!!! मानसिकता तीच...धारणा तीच...अभ्यासक्रम तोच , शाळा वेगळ्या, युनिफॉर्म वेगळा, माध्यम वेगळं....आम्ही फक्त प्रतिक्रियावादी झालो,असं वाटतं अनेकदा...बौद्ध धम्म उरला फक्त शाळा सोडल्याच्या दाखल्यावर, जात प्रमाणपत्र आणि भिंतीवरल्या फोटोत...वर्तणुकीत तो उतरलाच नाही...इथे मला कर्मकांड, विधी, सोपस्कारवाला धम्म अपेक्षित नाही..तर बुद्धाच्या शिकवणुकीचे प्रत्यक्ष जीवनात पालन करणारा धम्म अपेक्षित आहे..भूतदया, सहनशीलता, सहिष्णुता, प्रेम यांचा अंगीकार करणारा धम्म अपेक्षित आहे..पण धर्मांतरित होऊन ६० वर्षे होत आली, आम्ही अजूनही नॉन-हिंदुच आहोत...बौद्ध बनण्याच्या धडपडीत असलेले, पण मिळालेली वाट हरवलेले...

Friday, 2 June 2017

रक्षाबंधन !!!

*कोणत्याही कृतीमागे प्रामाणिकता असेल, तरच त्यातून सकारात्मक फलश्रुती होते.*

रक्षाबंधन हा भावाबहिणीच्या पवित्र नात्याचा सण. भावाने बहिणीला दिलेली संरक्षणाची हमी. पण इथे बहिण भावाला राखी बांधत असल्याने बहिणीने भावाला संरक्षणासाठी
केलेली आर्जव म्हणू़या आपण !!!

प्रत्यक्षात हे भाऊ लोक बहिणींचं नेमकं काय संरक्षण करत असतात ? तर काही नाही !!! बहिणीने वेडंवाकडं वागू नये, यावर नजर ठेवण्यासाठीची भाऊ ही एक व्यवस्था आहे. नजर चुकवून बहिण काही वेडंवाकडं वागलीच, तर तिला क्रूरपणे संपवण्यासाठीही केलेली भाऊ ही सामाजिक व्यवस्था आहे.

इथे भाऊ वेडावाकडा वागला तर नजर ठेवण्याचा अधिकार बहिणींना वयाने मोठी असली तरी दिलेला नाही.

बरं संरक्षणाची हमी म्हणजे फक्त आपल्याच बहिणीच्या संरक्षणाची हमी का ? मग इतरांच्या बहिणींच्या किंवा ज्यांना भाऊच नाही, अशा बहिणींच्या संरक्षणाची हमी कोणी घ्यायची ?

नाक्यानाक्यावर उभं राहून मुलींना छेडणारे, शेरेबाजी करून जिणं मुश्कील करणारे भाऊ, शाळाकॉलेजांतील मुलींचा त्यांच्या मनाविरूध्द भयावह पाठलाग करणारे भाऊ, बलात्कार करणारे भाऊ, बलात्कारावेळी अन्यायअत्याचारांची परिसीमा गाठत मुलींची हत्या करणारे भाऊ, या सगळ्या भावांतलं भाऊपण जातं कुठे ? ते रक्षाबंधन किंवा भाऊबीजेच्या दिवसांपुरतंच मर्यादित इतकं ढोबळ कसं असू शकतं ? आणि हे भाऊ जेव्हा समाजात स्त्रियांना नामोहरम करतात, तेव्हा इतर भाऊ नेमकी काय भुमिका निभावत असतात ?

*वास्तविक, रक्षाबंधन करताना, स्त्रियांनी भावाला, माझी जशी काळजी करतोस, तशी समाजातल्या सगळीच मुलींची कर, असं आवर्जून सांगायला हवं.*

*तसं झालं तरच, मला मुक्तपणे वावरता येणार आहे. मनमोकळं जगता येणार आहे. माझे निर्णय घेताना ते तुझ्याशी निरोगी चर्चा करून घेता यावेत, असं आपुलकीचं, जिव्हाळ्याचं नातं आपल्यात असलं पाहिजे. माझं आत्मभान तुला मान्य करता आलं पाहिजे. केवळ स्वत:च्या तथाकथित सामाजिक प्रतिष्ठेसाठी नव्हे, तर माझीही व्यक्तिगत प्रतिष्ठा जपण्यासाठी तुझं पाठबळ हवं. माझंही माणूस म्हणून स्वतंत्र अस्तित्व तू मान्य करायला हवंस. तुला असलेलं व्यक्तिगत स्वातंत्र्य मलाही असलं पाहिजे, म्हणून माझ्या पाठीशी उभा राहा. केवळ बहिण म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून जगण्याचा माझा अधिकार तू मान्य केला पाहिजेस आणि तुझ्यावरच अवलंबून न राहता, मलाच माझं स्वत:चं संरक्षण प्रसंगी करता आलं पाहिजे, असं सक्षम घडण्यासाठी मला पूरक साथ दे, असं आज बहिणीने भावांना सांगितलं पाहिजे.*

रक्षाबंधन हा सण भाऊबहिणींच्या रक्ताच्या नात्यातून जन्माला आलाय, असे संदर्भ पुराणात, इतिहासात कुठेच नाहीत.

बळीराजाशी कपटीपणा करायला गेलेल्या विष्णूला बळीने बुध्दिमतेच्या जोरावर अडकवून ठेवले, तेव्हा लक्ष्मीने सोयीस्कररित्या बळीला हातात धागा बांधून बळेच भाऊ मानले व त्याबदल्यात विष्णूची सुटका करून घेतली, असा एक संदर्भ आहे.

सूर आणि असूरांच्या लढाईत इंद्राचा विजय व्हावा, म्हणून इंद्राणीने त्याला हातात धागा बांधला, हा संदर्भ भावाबहिणीतील नसून पतीपत्नीतील आहे.

इतिहासकाळात लढाईत पराभव होत असताना, पुढचा अनर्थ टाळण्यासाठी एका राजाच्या पत्नीने दुसऱ्या राजाला सोयीस्कररित्या भाऊ मानल्याचं आपल्याला दिसतं.

भावाबहिणीतील नातं पवित्रच असतं. पण रक्षाबंधन हा सण त्या पवित्रतेतून सुरू झालाय, असं दिसून येत नाही. म्हणूनच तो सामाजिकदृष्ट्या जबाबदार, दीर्घकालीन ठाम भाऊ घडवत नाही. रक्षाबंधन करणारा भाऊ रक्षाबंधनादिवशीच संपतो. त्यानंतर असतो, तो फक्त पुरूष. स्वत:च्या बहिणीसकट समस्त स्त्रियांना आपल्या नजरकैदेत ठेवू पाहणारा, त्यांचं माणूस म्हणून अस्तित्व नाकारणारा पुरूष.

हे चित्र बदलायला हवं. बहिणीने भावाला हातात धागा बांधल्यावर भावानेही बहिणीच्या हातात धागा बांधण्याची प्रथा सुरू व्हायला हवी.

*फक्त तुलाच नाही, तर समाजातील सर्वच स्त्रियांना संरक्षणाच्या मेहेरबानीची गरजच लागणार नाही व  मुक्तपणे वावरता येईल, असं निकोप सामाजिक वातावरण तयार करण्याची मी हमी देतो, असं भावाने बहिणीला सांगितलं पाहिजे.*

सण, उत्सव हे व्यापाऱ्यांचा धंदा व्हावा, म्हणून रूढींमागे फरफटत जावून पार पाडावयाचे उपचार ठरता कामा नयेत. जातीधर्मभाषाप्रांतांच्या पलिकडे माणुसकीची नाती निर्माण करण्यासाठी, एक चांगला समाज घडवण्यासाठीही सणउत्सवांचा वापर बदलत्या काळानुसार झाला पाहिजे.

कारण,

*माणूसपण जपणारं*
*मन तितकं मोठं असतं,*
*आपुलकीचं नातं खरं*
*बाकी सगळं खोटं असतं !!*


*राज असरोंडकर*
कायद्याने वागा लोकचळवळ

Tuesday, 16 May 2017

अतुल तापकीरने एक्झीट का घेतली ?

लग्न ही ज्यांच्यासाठी नजरकैद आहे, पारतंत्र्य आहे, त्यांनी त्यातून लवकरात लवकर बाहेर पडलेलं बरं. मध्यंतरी साम टीव्ही चे संपादक संजय आवटे Sunjay Awate सावित्री उत्सवात म्हणाले होते, लग्न जितकं सोपं आहे, तितका घटस्फोटही सोपा असला पाहिजे.

पटत नसतानाही जोरजबरदस्तीचा मामला का ? खरं तर, स्वातंत्र्य कोणाला नको असते ? स्रीयांनाही ते हवंच असतं की...पण इथे पारतंत्र्यापेक्षा गंभीर समस्या आहे, सामाजिक सुरक्षिततेची !!! परंपरेने लादलेल्या परावलंबित्वाची !!!

नसती झंझट नको म्हणून तथाकथित प्रतिष्ठा जपण्यापायी मुलीचं लग्न उरकणारा समाज आहे आपला. अशावेळी तिच्या आवडीनिवडींना फार स्थान नसतंच. मग तीही तडजोडीची मानसिकता जोपासत जगते.

आपुलकीच्या, परस्पर आदराच्या नात्याची भावना जावून मालकी हक्काची भावना आली की तिथून घर विस्कटायला सुरूवात होते. संवाद तुटतो. दुरावा निर्माण होतो. अंतर वाढतं. पण तरीही बळेने हजारों जोडपी एका छताखाली वावरत असतात.

आपल्याकडच्या समाजव्यवस्थेनुसार तिला माहेर आधीच तुटलेलं असतं. सासर तुटू नये, यासाठी ती जंग जंग पछाडते. आपलं पुढे काय होईल, या चिंतेने भयभीत होऊन ती सहकाऱ्याला सतत दबावाखाली ठेवू पाहते. कधी जीव द्यायच्या, कायदेशीर कारवाईच्या अधूनमधून धमक्या देते. त्याचाही पुरूषी अहंकार उफाळून येत असतो. त्याच्याकडे शिवीगाळीचा, मारझोडीचा पर्याय असतो. नात्यातून बाहेर पडायच्या मानसिकतेपर्यंत परिस्थिती दोघांना घेऊन जाते. पण तिच्या पुढे फक्त अंधार वाढून ठेवलेला असतो आणि त्याला फौजदारी कारवाईची, वयोवृध्द आईवडिलांच्या ससेहोलपटीची, सामाजिक प्रतिष्ठेची चिंता असते.

इथे मनं जुळवणारी किंवा परस्पर सहविचाराने विभक्त होण्याचा सल्ला देणारी कुटुंब कल्याण केंद्रे नाहीत, तर, परत जर तक्रार आली तर ' आत टाकू ' असं धमकावणारी ' महिला तक्रार निवारण समिती ' च्या रूपात एक अपरिपक्व एकांगी, अशा विषयांच्या नाजूक पदरांच्या अभ्यासाचा अभाव असलेली संवेदनशून्य सरकारी उपाययोजना आहे.

घराबाहेर जीणं महाग, खडतर, हराम करणाऱ्या शेकडो समस्या आ वासून उभ्या असलेल्या आणि घराकडे परतावं, तर नकळत चीडचीड निर्माण करणारं विसंवादी नातं डोळ्यासमोर येतं. इच्छा नसतानाही परतावं लागतंच. टोमणे स्वागताला असतात. प्रत्येक रात्र कूस बदलत, तळमळत जाते. उलटसुलट विचार, शक्यता झोपू देत नाहीत...

या वातावरणाचा दुष्परिणाम तब्येतीवर होतो. आवडनिवड, छंद हरवत जातात आणि मनाचा, मेंदूचा ताबा वैफल्यग्रस्ततेकडे कधी जातो, थांगपत्ताही लागत नाही. या परिस्थितीत तथाकथित मित्रमंडळी समजूत काढण्यापलिकडे, थातुरमातुर सांत्वन करण्यापलिकडे काही करू शकत नाहीत. पण आतून एकच आवाज येतो....एक्झीट !!! जी अतुल तापकीरने घेतली ...