Tuesday, 5 December 2017

खर्डा

दलित युवकांच्या हत्येचं प्रकरण आहे ना, मग प्रतिक्रिया कोण देणार माध्यमांना रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे.....इत्यादी....मग राज ठाकरे, उध्दव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा, एकनाथ खडसे, माणिकराव ठाकरे यांची काय वाचा बसलीय...? अरे जातीयवादातून नका बघू, या घटनेकडे तुमच्या सोयीनुसार, पण एक १७ वर्षाचा गरीब युवक क्रूरपणे हाल हाल करून ठार मारला जातो, पक्षातर्फे साधा निषेध तरी करा...

खर्डा गाव नगर जिल्ह्यात असलं तरी बीड आणि उस्मानाबादच्या सीमेवर आहे. बीड मध्ये गोपीनाथ मुंडे आहेत. स्थानिक आमदार राम शिंदे भाजपाचे, खासदार दिलीप गांधी भाजपाचे....पण कोणीही फिरकलेले नाहीत. पालकमंत्री मधुकर पिचड १ महाराष्ट्र दिनाचं झेंडा वंदन करून गेले. पण त्यांना थोडं पुढे जाऊन आगे कुटुंबाची विचारपूस करावीशी वाटली नाही...मग पाच दिवस उलटून पोलीस पाटीलसुद्धा फिरकला नसेल, तर नवल काय..? कारण सरळ आहे...ग्राम पंचायत, पंचायत समिती राष्ट्रवादीकडे आहे. आरोपी कंपनी तिथे सत्तेवर आहे. राजकारण चालतं बहुमतावर...हल्लेखोर बहुमतात आहेत....आणि पिडीत जातीची पाच पन्नास घरं...अशावेळी पीडितांना सहानुभूती दाखवून राजकीय अवसानघातकीपणा कोण करणार..? एरव्ही एकमेकांची उणीधुणी काढणारी राजकीय मंडळी जातीयवादाच्या प्रकरणात पडद्यामागे कशी गळ्यात गळे घालून असतात, ते अशा प्रसंगात दिसतं...

नगर जिल्ह्यातल्याच सोनई हत्याकांडातसुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोक गुंतलेले होते. पक्षाने त्यांना काढून टाकल्याचं अजून ऐकिवात नाही. पालकमंत्री असूनही बबनराव पाचपुते घटनास्थळी फिरकले नव्हते. शरद पवारांनी पाचपुते किंवा पिचडांना याबाबत खडसावलं असेल, असं वाटत नाही.

नितीन आगेच्या वडिलांना मी विचारलं...त्याचे कोणी मित्र आहेत का जवळचे....तर म्हणाले, तेच होते ज्यांनी त्याला ठार मारलं...याचा अर्थ स्पष्ट आहे, प्रेम, मैत्री, माणुसकी यांच्यापेक्षा जातिवाद नव्या पिढीच्याही मनात किती खोल रुजला आहे. मुलाला मारहाण झाली ऐकल्यावर सैरभैर शोधत फिरणाऱ्या नितीनच्या आईवडिलांना ही मुले सांगतात....आम्ही हाणलाय त्याला..हाणून पाठवलाय तिकडं कान्होबा मंदिराकडं......किती हा माज...पुरोगामित्व फक्त नेत्यांच्या बोलघेवडेपणात टिकून आहे...भाषणात फुले आंबेडकरांचा विचार आणि प्रत्यक्षात मनात जातीवादी विखार...नाहीतर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतून एका शिकू पाहणाऱ्या हिंदू महार युवकाला फरफटत नेऊन निर्दयतेने ठार मारलं गेलं नसतं...दोनच दिवसापूर्वी त्याने आईला सांगितलं होतं, की मुलगी म्हणते, मला तूच नवरा करायचाय...पण ती माऊली म्हणाली, लेकरा आपण गरीब लोक..तू ह्या लफड्यात पडू नकोस....कदाचित हेच मुलीला सांगताना पाहिलं गेलं असावं नितीनला आणि तेच त्याच्या मृत्यूला कारण ठरलं....

काल वाल्मिकी नेते मोहन कंडारे, ओबीसी नेते उपेंद्र बोऱ्हाडे आणि मी खर्डा गावी जाऊन आलो. सांगितलं नितीनच्या वडिलांना आणि तिथे जमलेल्या युवकांना....नेते येतील आणि जातील, चार दिवस लोक सहानुभूती दाखवतील..पण आपली लढाई आपल्यालाच लढायची हे लक्षात घेऊन पावलं टाका...एफ आय आर नीट वाचून घ्या..शिकलेल्या पोरांकडून...काय राहिलंय का बघा...काय चुकीचं टाकलंय ते बघा..आणि पोलिसांना सांगून दुरुस्ती करून घ्या...वास्तविक एफ आय आर पुरेसा बोलका आहे. आता जबाबदारी पोलिसांची आहे...भक्कम पुरावे असलेलं आरोपपत्र दाखल झालं तर उपयोग...नुसतं जलदगती न्यायालय मंजूर होऊन उपयोग नाही...

नितीनचे वडील म्हणत होते, त्यांना इतकाच राग होता तर स्वतःच्या मुलीला का नाही मारलं असं हाल हाल करून...? म्हणाले, साहेब आम्हाला रस्ता दाखवा..आम्ही लढू..पण माझ्या मुलाचे मारेकरी फासावर गेले पाहिजेत...नितीनच्या वडिलांची आर्जव मनावर घेतलीय, इतकंच आता जाहिर करतो....

- राज असरोंडकर, मोहन कंडारे, उपेंद्र बोऱ्हाडे...

No comments:

Post a Comment