पत्रकार मित्राचा फोन आला. उल्हासनगरला आलोय. दुःखद घटना आहे. बहिणीची मुलगी गेली. मी विचारलं, कशाने? तर उत्तर आलं, ह्रदयविकाराचा झटका... अच्छा ? किती वय होतं तिचं, तर ऐकायला मिळालं,२१.
२१ वर्षाची सीएची विद्यार्थीनी अचानक हे जग सोडून जाते. कसली लक्षणं नाहीत, त्रास नाही, आजार नाही की काही नाही. सकाळी नेहमीसारखी उठली, फ्रेश झाली, नाश्ता केला आणि काही क्षणातच तिचा मृत्यू झाला होता.
अस्वस्थ करणारी घटना होती. काही सूचत नव्हतं. जाऊन तिला पाहून आलो. शांत निजली होती, शेकडो प्रश्नांना जन्म देत...
एक काळ होता. चाळीस वर्षे वयाच्या व्यक्तिला ह्रदयविकाराचा झटका आला, तरी लोक म्हणायचे, हे काय वय आहे, असल्या आजारांचं?
मी माझ्या फॅमिली डाॅक्टरना काॅल केला. त्या स्वतः ह्रदयरोग तज्ञ आहेत. त्यांनाच विचारलं, ह्रदयविकाराचं वय खाली उतरलंय का? त्यांनी सांगितलं की अगदी दैनंदिन केसेस नसल्या तरी, वय खाली आलंय, हे खरं आहे. मी विचारलं, ताणतणाव हेच त्याचं कारण आहे का? त्यावर त्या म्हणाल्या, ते तर आहेच, पण बदलत्या काळातला आहार, जगण्याची पध्दतसुध्दा कारणीभूत आहेत. मैदानी व्यायामच उरलेला नाही आणि जिममधला व्यायाम तुमची प्रतिकारशक्ती वाढवत नाही.
आणि भोवतालचं सामाजिक वातावरण... ? तेसुध्दा तुमचं आयुर्मान ठरवत असतं. कळतनकळत तुमच्यावर नियंत्रण करीत असतं. कुणाला वेळ आहे, यावर विचार करायला? असतात का राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर असले विषय?
No comments:
Post a Comment