Friday, 9 March 2018

बोटक्लब

*भाजपाच्या सत्तेत भारतमातेची विटंबना*

उल्हासनगर महानगरपालिकेच्या बोटक्लब उद्यानातलं भारतमातेचं शिल्प सद्या मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे दुरवस्थेत आहे. केवळ व्यापारी हेतूने राजकारण करणाऱ्या उल्हासनगरातील भाजपाकडून राष्ट्रभक्तीची अपेक्षाच करणं अवास्तव ठरतं. जिथे देशभरातच वंदे मातरम, भारतमातासारखे मुद्दे स्वार्थी राजकारणात तोंडी लावण्यापुरती वापरणारी भाजपा उल्हासनगरात सत्तेत आहे. बोटक्लबमधील भारतमातेच्या विटंबनेमुळे भाजपाचा ढोंगी चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

*प्रल्हाद अडवानींनी उभारलं होतं*
*बोट क्लब उद्यान*

जनसंघाचे प्रल्हाद अडवानी उल्हासनगरच्या नगराध्यक्षपदी होते, त्यावेळी नगरपालिकेचं बजेट अवघं ४ कोटींचं होतं. तरीही इच्छाशक्तीच्या जोरावर अडवानींनी बोटक्लब उद्यान उभं केलं. आज ७०० हून अधिक कोटींचं बजेट असताना त्या उद्यानाला अक्षरशः अवकळा आली आहे. या उद्यानात शाळकरी मुलांच्या वनसहली यायच्या,
सहभोजन व्हायचं. हिरवाईने नटलेलं होतं हे उद्यान. उद्यानातील तलावात बोटींगची व्यवस्था होती. नागरिकांसाठी बोटक्लब उद्यान एक आवडतं विरंगुळा ठिकाण होतं.

*माहितीपूर्ण राष्ट्रशिल्पंही उभारली होती*

प्रभु रामचंद्र, गुरू गोविंदसिंग, छत्रपती शिवराय, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई, महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एका प्रसंगावर आधारित वास्तुशिल्प आणि त्या प्रसंगाची सविस्तर माहिती असं त्या राष्ट्रशिल्पांचं स्वरूप होतं. त्यातली बहुतेक शिल्प गायब असून, प्रभु राम, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई यांची शिल्प दुरवस्थेत राजकारणांच्या कोडगेपणाची साक्ष देत उभी आहेत. यात एक शिल्प भारतमातेचं आहे, ज्यावर सारे जहांसे अच्छा हे गीत कोरलेलं आहे. भारतमातेचं हे शिल्पही तिथे बकाल अवस्थेत उभं आहे. अस्वच्छतेचे दूत म्हणून ओळखली जाणारी डुकरं या शिल्पांची देखभाल करताहेत.

*यापूर्वी वेधले होते दुरवस्थेकडे लक्ष*

कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून, नगरसेवक असताना आणि नंतर चळवळीच्या स्थापनेनंतरही हा विषय वारंवार चव्हाट्यावर मांडला आहे. प्रत्येकवेळी कायमस्वरूपी उपाययोजनांची हमी देऊन तात्पुरती साफसफाई केली जाते. सद्यस्थितीत कचरा वाहतूक ठेकेदाराला वाहनतळासाठी बोटक्लब उद्यानाची जागा देण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजनेतील जलकुंभाची उभारणीही उद्यानात करण्यात आली आहे. त्यामुळे उद्यानाला अवकळा आली आहे. उल्हासनगर मनपा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या मेंदूत किती कचरा भरलाय, याची प्रचिती या उद्यानाची दुरवस्था पाहून येते.

*मन की मैल ना धोयी...*

उल्हासनगरात सद्या स्वच्छता अभियानाने जोर धरला आहे. ज्यांनी कधी स्वतःच्या धार्मिक दरबारासमोरील अस्वच्छतेबाबत किंवा एकूणच शहरातील समस्यांबाबत एक अवाक्षर काढलेले नाही, अशा व्यक्तींना महापालिकेने स्वच्छता दूत नेमले आहे. शहारात जाहिरातींमध्ये जोरदार स्वच्छता मोहिम सुरू आहे. पण बोटक्लब उद्यानासारखी सार्वजनिक ठिकाणं या मोहिमेपासून दुर्लक्षित आहेत.

*सगळा हलकटपणा खाजगीकरणासाठी*

उल्हासनगर महापालिका बोटक्लब उद्यानाची निगा राखू शकली नसती, असं नाही, पण ही जागा खाजगीकरणाच्या नावाखाली गिळंकृत करण्यासाठी बडी धेंडं टपलेली आहेत. लोकप्रतिनिधीही स्वार्थासाठी भूमाफियांसोबत आहेत. एकदा हा डाव कायद्याने वागा लोकचळवळीने उधळून लावला होता. मात्र, लोकप्रतिनिधींची लालसा संपलेली नाही. उद्यानाच्या खाजगीकरणाचा विषय कधीही डोकं वर काढू शकतो. अशा वेळी ही सर्व राष्ट्रशिल्पं उखडून फेकून द्यायला महापालिका मागेपुढे बघणार नाही. महापालिकेत सत्ता भाजपाची आहे आणि सद्यस्थितीत भाजपाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

*बोटक्लब युजर्स फोरमची घोषणा*

कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी बोटक्लब युजर्स फोरमची घोषणा केली असून, हा नागरिकांचा फोरम उद्यानाच्या पुनर्जीवनासाठी कार्यरत राहिल. सद्या ती जागा ज्यांच्या ताब्यात आहे, त्यांच्याकडून ती ताबडतोब काढून घ्यावी, ही फोरमची पहिली मागणी असेल. उल्हासनगरातील कोणीही जागरूक नागरिक या फोरममध्ये सहभागी होऊ शकतात, असे आवाहन राज असरोंडकर यांनी केलं आहे.

संपर्क : 9850044201
kaydyanewaga@gmail.com

शासनाच्या गटारी उपाययोजना

"बंदिस्त जागेत सफाई करताना कामगारास अस्वस्थ वाटल्यास तो अर्ध्यातून बाहेर येऊ शकेल!!!"

ही मेहेरबानी दाखवलीय, महाराष्ट्र शासनाने, भुयारी गटारात उतरून काम करणाऱ्या कामगारांसाठी!!!

सरकार असं नाही म्हणत की भुयारी गटारात कामगारांना उतरवून गु-घाणीत शिरून सफाई करण्याची अमानवीय पध्दतच आम्ही बंद करू. उलट, भुयारी गटारं कामगारांकडून साफ करून घेताना कोणकोणती काळजी घ्यावी, याबाबतचं एक निर्लज्ज परिपत्रक राज्यातलं उलट्या काळजाचं सरकार जारी करतं. तेही स्वयंस्फूर्तीने शासनाचं कर्तव्य म्हणून नाही, तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने फटकारल्यानंतर.

मीरा-भायंदर महानगरपालिका क्षेत्रातील अनुराधा इंडस्ट्रीअल इस्टेटमध्ये भुयारी गटारांची सफाई करताना, तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मार्गदर्शक तत्त्व आखून दिलीत. त्यांनाच अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने आज ५ मार्च, २०१८ रोजी एक परिपत्रक जारी करण्याची औपचारिकता पार पाडली आहे.

या परिपत्रकात दिलेल्या सूचना वर वर आदर्शवत वाटतात, पण स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आणि संबंधित ठेकेदाराकडून सुरक्षिततेच्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या गेल्यात, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी घडून येण्याची काही शक्यता नाही. ज्या स्थानिक संस्था स्वतःच्या झाडू कामगारांच्या सुरक्षिततेच्या कुठल्याही उपाययोजना करीत नाहीत, त्या संस्था असंघटित कंत्राटी कामगारांच्या जीवाची पर्वा करतील, याची सूतराम शक्यता नाही.

परिपत्रकाची सुरूवात शक्यतो यांत्रिकी पध्दतीने करावी, अशी करून त्या सूचनेची एकाच ओळीत बोळवण करून, उर्वरित अख्खं परिपत्रक कामगारांकडून सफाई करून घेताना कोणती काळजी घ्यावी, यावर आहे. नागरिकाच्या वैयक्तिक प्रतिष्ठेच्या संविधानिक अधिकारांचं हनन तर सोडाच, पण एखाद्याला मृत्यूच्या दाढेत ढकलून मरू नये म्हणून घ्यावयाची काळजी नमूद करणारं परिपत्रक काढून सरकारने संवेदनहीनताच दाखवली आहे. मानवी मैला डोक्यावरून वाहून नेण्याची प्रथा बंद आहे, म्हणून सांगितलं जातं आणि त्याच मैल्यात उतरण्यापूर्वी घ्यायच्या खबरदारीबाबत सूचना जारी करून सरकारने एकप्रकारे ह्या अमानवीय प्रथेलाच अप्रत्यक्ष राजमान्यता दिली आहे. या सूचनांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या तथाकथित मार्गदर्शक तत्त्वांचा आधार असेल तर आयोगातील मंडळींनीच आधी मानवतेची संकल्पना नीट समजून घेण्याची गरज आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते.

*ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटीक्स

*ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटीक्स*

उत्कृष्ट संसदपटू होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांची या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नेतृत्वात निर्मिती होण्याच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटीक्स सुरु केले होते. बाबासाहेब स्वतः या संस्थेचे संचालक होते व शां. श. रेगे रजिस्ट्रार होते. देशातील लोकशाहीविषयक विचाराला आणि कार्याला परिणामकारक चालना मिळावी, त्याचप्रमाणे आपल्या नियोजित रिपब्लिकन पक्षामध्ये तरुणांची भारती व्हावी, ह्या हेतूने राजकारणात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी हे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले होते. जे विधिमंडळात कामकाज करण्याची महत्वाकांक्षा बाळगतात त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था या प्रशिक्षण केंद्रात बाबासाहेबांना करायची होती. शिक्षक होऊ इच्छिणारा मनुष्य आपल्या विषयात प्रवीण पाहिजे. त्याला उत्तम रीतीने व्याख्यान देता आलं पाहिजे, त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक पाहिजे, विद्यालयाचा लौकिक शिक्षकाच्या कर्तुत्वावर आणि वक्तृत्वाच्या सामर्थ्यावर बराच अवलंबून असतो, असे बाबासाहेबांचे मत होते. १ जुलै ५६ ते मार्च ५७ पर्यंतच हे विद्यालय चालले. बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर पोरके होऊन ते बंद पडले. संसदीय संस्थेमध्ये सभागृहाला आपल्या सौम्य अथवा तीक्ष्म तर्कशुद्ध आणि माहितीपूर्ण भाषणाने जो सभासद भरून टाकू शकतो, तोच सभासद यशस्वी होऊ शकतो, हे बाबासाहेबांचे उद्गार....ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटीक्स मध्ये राजकारण, अर्थशास्त्र, अंदाजपत्रक, कामगार संघटना, संसदीय कामकाजविषयक नियम आणि परंपरा इत्यादी आवश्यक विषयांबरोबर बाबासाहेबांनी वक्तृत्व साधनेला महत्व दिले होते. डिसेंबर ५६ मध्ये बाबासाहेब स्वतः या संस्थेत वक्तृत्वावर व्याख्यान देणार होते. पण त्यांच्या आकस्मिक परीनिर्वाणाने एका प्रभावी वक्त्याच्या मार्गदर्शनाला ती संस्था व तिथले उत्सुक विद्यार्थी मुकले...

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे या पुस्तकातून.*

प्रचार व प्रसार  : राज असरोंडकर
कायद्याने वागा लोकचळवळ

" ट्रेनिंग स्कूल फाॅर एन्ट्रन्स टु पाॅलिटिक्स " सारखे विषय कायद्याने वागा लोकचळवळीच्या अजेंड्यावर आहेत !!!

वसंत भोईर : लोकवैज्ञानिक

प्रदूषणविरोधी उपकरण बनवणाऱ्या वसंत भोईरांना
कायद्याने वागा चा लोकवैज्ञानिक पुरस्कार

कारखाने आणि वाहनांतून बाहेर पडणारे वायुपदुषण रोखण्यासाठी डोबिवलीतील सोनारपाडा येथील वसंत भोईर यांनी एक यंत्र तयार केले आहे. या यंत्राच्या माध्यमातून हवेतील कार्बन डायॉक्साईड शोषून घेवून तयार झालेली शुध्द हवा पुन्हा वातावरणात सोडणे शक्य होणार आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून वसंत भोईर वेगवेगळ्या संकल्पना राबवून पर्यावरणावर काम करु इच्छित आहेत. पण शासनदरबारी त्यांच्या संशोधनाची, प्रयत्नांची, धडपडीची दखल घेत नसल्याची खंत भोईर यांना होती. कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी आपला ११ मार्च रोजीचा वाढदिवस वसंत भोईर यांच्या धडपडीला अर्पण करून त्यांना लोकवैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित केले व उपस्थितांना सामाजमाध्यमातून त्यांचे संशोधन सरकारपर्यंत पोचविण्याचे आवाहन केले. 

वसंत भोईर मेकमको कंपनीत कामाला आहेत. काम करताना अनेक कल्पना त्यांच्या डोक्यात येत असतात आणि मग त्या सत्यात उतरविण्यासाठी सुरू होते, वसंत भोईरांची धडपड. नवनवीन शोधात त्यांच्या डोक्यात विचारांची चक्रे अखंड सुरू असतात. घराच्या छपरावर प्रदुषणामुळे जमा होणाऱ्या कार्बनच्या थराने वसंत भोईरांना अस्वस्थ केले आणि त्यातूनच जन्माला आले, वसंतयंत्र...जणू प्रदुषणमुक्त वातावरणात आपल्या जीवनात वसंत फुलवू पाहणारा एक विज्ञानमंत्रच....

वसंत भोईर यांनी केवळ हवेतील कार्बन शोषून घेणारा आराखडा तयार केलेला नसून, रेल्वे गाड्यांतील मलविसर्जनापासून गॅस व वीज निर्मितीचीही संकल्पना त्यांच्याकडे तयार आहे. वसंत भोईर यांनी आपल्या प्रत्यक्ष अनुभवातून तयार केलेल्या पर्यावरणविषयक उपाययोजनांकडे समाजाचं लक्ष द्यावं व त्यांच्या धडपडीला सामाजिक पाठबळ मिळावं, यासाठी राज असरोंडकर यांनी त्यांचा यंदाचा 11 मार्च रोजीचा वाढदिवस वसंत भोईर यांच्या प्रयत्नांना अर्पण केला. कमलादेवी महाविद्यालयाचे संचालक सदानंद तिवारी, विविधा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विलास देशपांडे, कायद्याने वागा चे केंद्रीय कार्याध्यक्ष विनायक जाधव, कायद्याने वागा हौसिंग कन्झुमर फोरमचे अध्यक्ष व उद्योजक भोजराज वाधवा, राजेश छाब्रिया, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे उत्तम जोगदंड व श्रीप्रसाद खुळे, टिएचआर बचत गट महासंघाच्या महाराष्ट्र अध्यक्षा जयश्री देशमुख, स्थानिक नगरसेविका प्रमिला पाटील, सोनारपाडाचे माजी सरपंच मुकेश पाटील, कायद्याने वागाचे कडोंमपा समन्वयक बापू राऊत, पत्रकार किशोर पगारे, प्रफुल केदारे, साहित्यिका वृषाली विनायक, कल्याण शहर समन्वयक राकेश पद्माकर मीना, सागर संजीवनी, स्वप्नील पाटील, एड. भुजंग मोरे, एड. निलेश मोहिते, विजय गौंड, शीतल बावधनकर, संगीता मोहोड, ललिता पेठकर, आन्सर कॉम्पुटर चे नितीन शेठ, उद्योजिका शिल्पा वाडकर, अपना बँकेचे शाखा अधिकारी मंगेश असरोंडकर, उल्हासनगर मनसे अध्यक्ष प्रदीप गोडसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वसंत भोईर यांच्या प्रयोगाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

ट्रकमधून बाहेर पडणारा काळा धूर उपकरणातून बाहेर पडल्यावर त्याला वास येत नाही, तापमान कमी होते, व आवाजही कमी होतो, हे यावेळी भोईर यांनी दाखवून दिले. विशेष म्हणजे, कामा चे अध्यक्ष देवेंद्र सोनी, मेट्रो कंपनीचे उदय वालावलकर, झेन केमिकलचे सी. एन. कदम, आणि जनक रावल अशा उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनीही प्रात्यक्षिक पाहून वसंत भोईर यांचे कौतुक केले.

हवेत कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढलेले आहे. हाच कार्बन डायऑक्साईड अवकाशात वर जातो आणि ढगांतून जमीनीवर पाऊस कोसळण्यात अडथळा निर्माण करतो. हवेच्या वाढत्या प्रदुषणामुळे वातावरणातला उष्माही वाढला असून तो भविष्यात एकूणच मानवजातीसाठी जीवघेणा ठरण्याची भीती जगभर व्यक्त केली जात आहे. पर्यावरण संरक्षण हा आता जगभरातला प्राधान्याचा विषय असून, आपल्याकडेही सरकार पातळीवर तसा दावा केला जातो, पण प्रत्यक्षात निम्न स्तरावर तसे गांभिर्य आढळून येत नाही. त्यामुळेच वसंत भोईर यांच्यासारखे सर्वसामान्य अल्पशिक्षित पण कल्पक लोक अभिजन व्यवस्थेकडून दुर्लक्षित राहतात. राज्य सरकारने समाजातील अशा व्यक्तिंचा शोध घेवून त्यांच्या विविध संशोधन, विकास प्रस्तावांसाठी आर्थिक पाठबळ उभे करण्याची आवश्यकता असताना, उलट त्यांनी केलेल्या पत्रव्यवहाराला साधी पोचही देण्याचे सौजन्य सरकारी यंत्रणा दाखवत नाही, हे खेदजनक आहे, अशी प्रतिक्रिया राज असरोंडकर यांनी याप्रसंगी दिली.

धर्माचा पगडा झुगारल्याशिवाय मुक्ती नाही!!!

तुमच्या पत्नी तुमच्यासाठी शेती आहेत, असं धर्मग्रंथात सांगणारे टोपीधारी आणि जास्तीत जास्त मुलं जन्माला घाला, म्हणणारे टिळेधारी, एरव्ही एकमेकांचे कट्टर दुश्मन असतात. सातत्याने एकमेकाच्या विरोधात विद्वेषपूर्ण बोलून दोन्ही बाजूंची आपापली सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि या सगळ्याच्या आधारे आर्थिक दुकानं व्यवस्थित सांभाळतात. एकप्रकारे पडद्यामागे ते परस्परपूरक सहकार तत्व बाळगून चालत असतात. बुध्दीबधीर अनुयायी यांची प्यादी असतात. इतर सर्व बाबतीत, यांच्यात कितीही शत्रुत्व दिसून येत असलं तरी, स्त्रियांच्या दुय्यमत्वाबद्दल त्यांच्यात कमालीचं एकमत आहे. कोणाचा बुरखा हा धर्मादेश असतो, तर कोणाचा घुंघटा समाजाची शान बनतो. कोणाला दर्ग्यात प्रवेश नसतो, तर कोणाला मंदिरात!!!ऋतुस्त्रावाबाबत दोन्हीकडच्या धारणा सारख्याच आहेत. त्या काळात दोन्हीकडे ती बाहेरचीच असते. जे काही लाज, लज्जा, संकोच, मर्यादा आहेत, त्या स्त्रीयांच्याच वाट्याला आहेत.  त्यांना रूढी, परंपरा, तथाकथित संस्कृतीचं कोंदण आहे आणि त्या सगळ्याचं नियमन होतं, धर्माचरणाने. धर्मांची अनेक नावे आहेत, अनेक रूपे आहेत, पण जातधर्मभाषाप्रांतापलिकडे समस्त महिलांचा एकच धर्म, गुलामी-परावलंबित्व, दुयमत्त्व अधोरेखित करणारा!!! स्त्रीयांचे म्हणून जे जे काही कौटुंबिक, सामाजिक, राजकीय प्रश्न आहेत, त्यांचं मूळ धर्म आहेत!!! या धर्मांचा पगडा जोवर जगातल्या समस्त महिला उखडून फेकून देत नाहीत, तोवर माणूस म्हणून त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव त्यांना होणं शक्य नाही!!! अन्यथा, कितीही शिकल्या, सवरल्या, नेत्या झाल्या तरी पुढील हजारों वर्षे त्यांची ओळख पुरूषांची शेती अशीच राहील, हे निश्चित!!!

ह्रदयविकाराचं वय कमी झालंय?

पत्रकार मित्राचा फोन आला. उल्हासनगरला आलोय. दुःखद घटना आहे. बहिणीची मुलगी गेली. मी विचारलं, कशाने? तर उत्तर आलं, ह्रदयविकाराचा झटका... अच्छा ? किती वय होतं तिचं, तर ऐकायला मिळालं,२१.

२१ वर्षाची सीएची विद्यार्थीनी अचानक हे जग सोडून जाते. कसली लक्षणं नाहीत, त्रास नाही, आजार नाही की काही नाही. सकाळी नेहमीसारखी उठली, फ्रेश झाली, नाश्ता केला आणि काही क्षणातच तिचा मृत्यू झाला होता.

अस्वस्थ करणारी घटना होती. काही सूचत नव्हतं. जाऊन तिला पाहून आलो. शांत निजली होती, शेकडो प्रश्नांना जन्म देत...

एक काळ होता. चाळीस वर्षे वयाच्या व्यक्तिला ह्रदयविकाराचा झटका आला, तरी लोक म्हणायचे, हे काय वय आहे, असल्या आजारांचं?

मी माझ्या फॅमिली डाॅक्टरना काॅल केला. त्या स्वतः ह्रदयरोग तज्ञ आहेत. त्यांनाच विचारलं, ह्रदयविकाराचं वय खाली उतरलंय का? त्यांनी सांगितलं की अगदी दैनंदिन केसेस नसल्या तरी, वय खाली आलंय, हे खरं आहे. मी विचारलं, ताणतणाव हेच त्याचं कारण आहे का? त्यावर त्या म्हणाल्या, ते तर आहेच, पण बदलत्या काळातला आहार, जगण्याची पध्दतसुध्दा कारणीभूत आहेत. मैदानी व्यायामच उरलेला नाही आणि जिममधला व्यायाम तुमची प्रतिकारशक्ती वाढवत नाही.

आणि भोवतालचं सामाजिक वातावरण... ? तेसुध्दा तुमचं आयुर्मान ठरवत असतं. कळतनकळत तुमच्यावर नियंत्रण करीत असतं. कुणाला वेळ आहे, यावर विचार करायला? असतात का राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर असले विषय?