Sunday, 17 May 2015

कॉंग्रेसला पर्याय मिळाला का ?

सरसेनापतीसारखा पुढारी, सभासद , मुलभूत योजना व शिस्त यांचा समावेश असलेली संघटना, ध्येय, धोरण आणि तत्वज्ञान, कार्यक्रम, राजकिय डावपेच आणि मुत्सद्देगिरी या बाबींच्या समावेशातून पक्ष बनतो. विशिष्ट ध्येयवादाने प्रेरित होऊन मतदारांनी केलेली संघटना म्हणजे पक्ष अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्याख्या केली आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष कॉंग्रेसला पर्याय म्हणून निर्माण व्हायचा होता. देशातील छोट्या छोट्या पक्षाचं विलीनीकरण या एका पक्षात करून कॉंग्रेसला पर्याय अशी एकच संयुक्त आघाडी असावी , हा बाबासाहेबांचा प्रयत्न होता. आज रिपब्लिकन पक्षाचेच छोट्या छोट्या पक्षात तुकडे करून बाबासाहेबांचं स्वप्न पार धुळीला मिळवलं गेलं.

आपल्या स्वप्नपूर्तीसाठी बाबासाहेबांची देशातील ज्या ज्या प्रमुख व्यक्तींशी बोलणी सुरु होती, त्यात एक नाव होतं, राम मनोहर लोहिया. या लोहियांचे चेले मुलायम, लालू, नितीश वगैरे यंदाच्या निवडणुकीत पार लयाला गेले. समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्वांवर आधारित पक्ष बाबासाहेबांना अपेक्षित होता. लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल रक्तविरहीत मार्गांनी घडवून आणणारी शासनपद्धती म्हणजे लोकशाही ही बाबासाहेबांची लोकशाहीची कल्पना. संविधानात्मक नीतिमत्तेच्या पालनावर बाबासाहेबांचा भर होता. बाबासाहेबांच्या स्वप्नातील कॉंग्रेसला पर्याय होईल असा पक्ष देशात उभा राहिलाच नाही.

आणीबाणीनंतर कॉंग्रेसचा सफाया झाला होता. इंदिरा गांधींनी ती सत्ता पुन्हा हस्तगत केली. त्यांच्या मृत्युनंतर राजीव गांधींना दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत मिळालं होतं. नंतरचा काळ मात्र आघाड्या सरकारांचा आला. आणि देशात प्रचंड अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली. कॉंग्रेसने काहीच केलं नाही, असंही नाही. पण देशातील जनतेचा विश्वास संपादन करण्यात कॉंग्रेस असफल ठरत गेली. गेल्या दोन वर्षात त्यावर कळस चढला. लोकांना कॉंग्रेस नकोशी झाली. अशावेळी देशासमोर एकच पर्याय होता, भारतीय जनता पार्टी. १९५१ पासून नाना क्लुप्त्या वापरून विविध रुपात वावरूनसुद्धा वारंवार अयशस्वी ठरलेली भाजपा काही काळ सत्तेत आली. पुन्हा गेली. पण प्रयत्नांचं सातत्य आणि येनकेनप्रकारच्या खेळ्या याची फलश्रुती आज भाजपाला स्वबळावर स्पष्ट बहुमत देण्यात झाली आहे.

कॉंग्रेसला पर्याय मिळाला, पण तो आंबेडकरी विचारधारेला रुचणारा नाही. अर्थात, आजच्या नव पुरोगामी, धर्मनिरपेक्ष,  आंबेडकरी विचारधारेतही बाबासाहेबांना अपेक्षित देशातील सर्व समाजघटकांना सामावून घेणारा व्यापक दृष्टीकोन नाही, हीच मोठी अडचण आहे. संयम, समन्वयाचा अभाव, ध्येयाची अनिश्चिती आणि वैचारिक गोंधळ. या बाबी परिवर्तनाच्या लढाईतील अडथळे बनले आहेत. समाजकारण आणि राजकारण यांची गल्लत होते आहे. योग्य राजकीय पर्याय देण्याची जबाबदारी पार पाडली गेली नाही. त्यामुळेच देशापुढे जो पर्याय होता, तो कसाही असला तरी स्वीकारण्याची पाळी देशावर आली.

भाजपाच्या ओठात पोटात वेगळं असेलही, किंबहुना आहेच, पण कॉंग्रेसविरोधातील राजकारण करण्यात, देशातील सर्व समाजघटकांना आपली भूमिका गळी उतरवण्यात तो पक्ष यशस्वी ठरला आहे, हे सत्य नाकारून उपयोग नाही. आपल्याला आपल्याला देशातील हा राजकीय बदल खटकत असेल, तर समर्थ राजकीय पर्याय देण्याचीही  तयारी हवी. नुसता विरोधाला विरोध करून काहीही साध्य होणार नाही.

No comments:

Post a Comment