डॉ. कुंदा प्रनि यांच्या फेसबुक पोस्टवर आलेल्या पुरूष प्रतिक्रियांमधून मर्दानगी विरोधात निरोगी पुरूषभान उपक्रमाची आवश्यकता अधोरेखित झाली. न्या. रानडे वृध्दापकाळात अल्पवयीन मुलीशी पुनर्विवाह करतात आणि वंशाला दिवाच हवा असेल तर तूच का नाही पुनर्विवाह करत, असं ज्योतिबा फुले सावित्रींना विचारतात, इथे ज्योतीबांमधलं निरोगी पुरूषभान दिसतं. स्त्रीयावरील अत्याचार रोखायचे असतील, तर सामाजिक दृष्टीकोन बदलावा लागेल आणि त्यात पुरूषांनी पुढाकार घेतला पाहिजे, हा विचार जगभरात स्वीकारला जाऊ लागला आहे. स्त्रीया चुकत नाहीत का ? चुकतात ना. स्त्रीच स्त्रीची शत्रू नसते का ? असते ना. पण स्त्रीयांच्या वर्तनावर, स्वभावावर, विचारांवर पुरूषप्रधानतेचा वर्षेनुवर्षे चालत आलेला प्रभाव आहे, हे दुर्लक्षून चालत नाही. पुरूषांचं सगळंच चुकतं का ? नाही, ज्योतीबा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि इतरही स्त्रीयांच्या प्रश्नांवर काम केलेले अनेक समाजसुधारक पुरूषच होते की !! ते हे काम करू शकले, कारण त्यांच्याकडे निरोगी पुरूषभान होते. दरम्यानच्या काळात राजकारणात समाजकारणात कडवटपणा आल्यावर, त्याला धर्मांधतेची जोड मिळाल्यावर मर्दानगीच्या व्याख्या बदलल्या. दंगलीत दुसऱ्या धर्माच्या स्त्रीयांवर बलात्कार करणं मर्दानगीत मोडलं गेलं. त्या बलात्काराचं समर्थन केलं गेलं, केलं जातं......कोणत्याही प्रकारच्या जातीय, धार्मिक तणावात, शत्रुत्वात स्त्रीयांना लक्ष्य केलं जातं. अगदी पुराणकाळापासून चालत आलंय. रामासारख्या आर्याला हिनवण्यासाठी सीतेचं अपहरण झालं आणि शूर्पणकेचं नाककान कापून रामानंही संकुचित पौरूषत्वच दाखवलं. अरूणा शानबागवरचा अत्याचारसुध्दा सोहनलाल वाल्मिकीची चोरीची तक्रार केल्यावरून बदला घेण्यासाठी झाला होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. स्त्रीयांना भोगवस्तु समजून अपमानित करणारी मर्दानगी प्रवृत्ती निवडायची की विवेक जागृत ठेवणारं निरोगी पुरूषभान, हे प्रत्येकाने बौध्दिक कुवतीनुसार ठरवावे. निरोगी पुरूषभान ही संकल्पना आजची तातडीची सामाजिक गरज आहे. नव्या संकल्पनांवर टीका होणारच हे गृहीत धरून आपण आपलं शांतपणे काम करत राहावं. उगाच वैचारिक फुटाणे कुटण्यात वेळ दवडू नये !!!!
No comments:
Post a Comment