Sunday, 10 May 2015

पत्रकारांचा लढा

उल्हासनगरात आजही किती जातीयवाद आहे, हे गोलमैदानातील हॉल प्रकरणात पुन्हा एकदा दिसून आलंय. गोलमैदानातील काही भाग साधू वासवानी ट्रस्टला देण्यात आलाय. मोठा भाग प्रजापिता ब्रम्हकुमारीज ना देण्यात आलाय आणि पोलिस चौकीजवळील हॉल व प्रांगण मिडटाऊन रोटरी क्लबला देण्यात आलाय. टाऊन हॉल कुमारच्या ताब्यात आहे. सर्व ठिकाणी सिंधी भाषिकांचं वर्चस्व असलेल्या संस्था आहेत. त्यात पत्रकार संघटनांसारखी सिंधीभाषिक अल्पसंख्येने असलेल्या संस्थेला गोलमैदानातील हॉलसकट काही भाग देण्याची वेळ आली तर सिंधी समाजातील राजकीय नेत्यांच्या पोटात दुखू लागलं. आपल्या अशा राजकीय भुमिकांमुळे भाषिक, जातीय संघर्ष उभा राहतो, याचं भान मात्र या नेत्यांना नाही. त्यातच, सिंधेतर विशेषत: मराठी भाषिकांचं नेतृत्व कचखाऊ असल्याने, गल्लीबोळातील पडीक समाजमंदिरे सोडली, तर शहरातील एकही बडी वास्तु मराठी वा इतर कुठल्या सिंधेतर समाजाकडे नाही. याची ना कुणाला खंत, ना खेद !! सिंधेतर समाज असा सामाजिक राजकियदृष्ट्या निराधार असताना शिवसेनेसारख्या पक्षातील अंतर्गत मतभेद रोटरीवाल्यांच्या पथ्यावर पडणारे आहेत. अशा विषयात सिंधी समाज राजकीय, वैयक्तिक मतभेद विसरून एकत्र होतो, तो स्वभाव मराठी नेतृत्वाकडे नाही.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाला अडीच वर्षे उलटली तरी अजून घोषित स्मारकाच्या हालचाली नाहीत. मग बाळासाहेब ठाकरे प्रेस क्लबसाठी उमाळा त्यांना कुठून येणार ? पत्रकारांना उल्हासनगरातील राजकीय सामाजिक स्थिती समजून घ्यायला पाहिजे. त्याहीपेक्षा प्रेस क्लबच्या हस्तांतरणात अडथळे निर्माण करणाऱ्यांना धडा शिकविण्याचा निर्धार पाहिजे. गोवा-लोणावळा ट्रीपवरच कृतकृत्य होणारी प्रवृत्ती असेल, तर ती फार काळ लढू शकणार नाही. तरीही, गेल्या काही वर्षांपासून उल्हासनगरातल्या पत्रकारांतही सामाजिक जाणीवेबाबत मरगळ आली होती. ती कुठेतरी झटकली जात आहे, हेही नसे थोडके. प्रेस क्लब हॉलच्या निमित्ताने सुरू झालेला आक्रमकपणा भविष्यात दीर्घकाळ टिकेल, अशी अपेक्षा आहे. शिवाजी पार्कवरील उपोषण आंदोलनास पाठींबा व हार्दिक शुभेच्छाही !!!

No comments:

Post a Comment