Monday, 29 August 2016

दुर्घटना नव्हेत, इशारे !!!!

*दुर्घटना नव्हेत, इशारे !!!*

धार्मिक उन्मादाचे, अव्यस्थेचे, बेफिकीरीचे, उदासीनतेचे अजून किती बळी हवेत ?
〰〰〰〰〰〰〰〰

१९९३ ला महानगर दैनिकात पत्रकारिता करीत असताना, सिंधी कुटुंबात गणपती ठेवलाय, म्हणून मी बातमी करायला गेल्याचं मला आठवतंय. ज्या कुटुंबाने गणपती ठेवला होता, त्याच्या प्रमुखाने मला सांगितलं की मुलाने खूप हट्ट केला, म्हणून बसवला गणपती !!!

पुढे मुलांचे हे हट्ट घराघरांतून पुरवले जाऊ लागले आणि ते गल्लीबोळात कधी झिरपले कळलंच नाही. उल्हासनगरात आता रोज गणपती येतात आणि रोज विसर्जित होतात. हौसेमौजेला गणपतीची प्रतिष्ठापना करणाऱ्यांनी इथली प्रशासकीय आणि सुरक्षा व्यवस्था जाम करून ठेवली आहे.

विशेषत: सिंधी समाजाचा उल्लेख यासाठी केला की सिंधी युवकांसाठी गणेशोत्सव म्हणजे एकप्रकारचं आर्थिक शक्तीप्रदर्शन असतं. याचा अर्थ इतर समाज फार शिस्तीत असतात, असं समजण्याचं कारण नाही.

मोठमोठ्या मूर्त्या, भडक रोषणाई, फटाक्यांची अमाप उधळण आणि कानठळ्या बसवणारे एकमेकांशी शक्तीप्रदर्शन करणारे डीजे यापलिकडे या गणेशोत्सवांमध्ये भक्तीभावाचा लवलेशही नसतो. आर्थिक मस्तीच्या जोरावर गणेश आगमनाची आणि विसर्जनाची मिरवणूक चौकाचौकात थांबवून वाहतूक कोंडी करण्यात या मंडळांना वीरता वाटते. या युवकांचे युथ आयकॉनही धांगडधिंग्यावर स्वार होऊन गुन्हेगारी राजकारण करणारे असल्याने मंडळांचा उन्माद आणि पोलिसांची हतबलता असं चित्र दरवर्षी गणेशोत्सव काळात पाहायला मिळतं.

कसलंही सामाजिक काय, वैयक्तिकही भान नसतं. अरूंद गल्लीबोळ, जागोजागचे खड्डे, चिखल, ओबडढोबड स्पीडब्रेकर्स, डोक्यावर कुठून कसंही गेलेलं आडवंतिडवं केबल आणि विद्युत तारांचं जाळं, बैनर्स, होर्डिंग्ज, पताका या सगळ्या बकाल अवस्थेतून वाट काढत या गचाळ शहरात यायला गणपतीला तरी कसं आवडेल, याचा विचार या उन्मादात कधी केला जात असेल का ?

दुर्घटना यापूर्वी घडल्या नाहीत, असं नाही, पण प्रत्येक वेळी लोकप्रतिनिधींनी मगरीचे अश्रु वाहायचे आणि स्वत:ची पापं झाकायची, लोकांनी त्याला वारंवार बळी पडायचं आणि वारंवार बळी जायचं व निवडणुकीत अव्यवस्थेला जबाबदार असणाऱ्यांनाच पुन्हा पुन्हा निवडून द्यायचं, असं चाललेलं आहे.

दुर्घटना घडतात, तर त्यात भविष्यकाळात सुधारण्यासाठी इशारेही असतात. पण मानवी जीवाची किंमतच आता कस्पटासमान झाली आहे. स्वार्थ, पैसा, चंगळवाद, धार्मिक उन्माद, हुल्लडबाजी यांना उधाण आलं आहे. त्यालाच लोक आता संस्कृती म्हणू लागले आहेत. या  तथाकथित संस्कृतीनेच सुजल गडापकर नावाच्या शाळकरी मुलाला दहीहंडी थरावर नेलं व पडून गंभीर जखमी केलं. जेएमडी ग्रुपच्या किशोरावस्थेतील दोन मुलांना वीजेचा धक्का लागून जीव गमावावा लागला. अजून किती बळी हवेत इथल्या अव्यवस्थेला, लोकप्रतिनिधींच्या बेफिकीरीला आणि लोकांच्या उदासीनतेला.

*जागे व्हा लोकहो, आपल्या घरातील प्रिय व्यक्ती गमावण्याच्या आधीच जागे व्हा !!!*


*राज असरोंडकर*
कायद्याने वागा लोकचळवळ

No comments:

Post a Comment